महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच आपण अजित पवार यांच्याबरोबर शपथ घेतली होती, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं. फडणवीसांच्या या विधानावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर स्वत: शरद पवार यांनी मिश्कील टिप्पणी केली आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांशी चर्चा केली होती, या देवेंद्र फडणवीसांच्या विधानाबद्दल विचारलं असता शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य आहे. इथं काहीही झालं की एका व्यक्तीचं नाव पुढं येतं, मग लातूरमध्ये एखादा भूकंप झाला तर तिथेही याच व्यक्तीचं नाव येतं…” शरद पवारांचा बोलण्याचा रोख स्वत:कडेच होता. या टिप्पणीनंतर उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला.

हेही वाचा- ‘मुख्यमंत्र्यांना एक फोन केला आणि सर्व मागण्या…’, पुण्यात शरद पवार आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीला

पहाटेच्या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली, असंही शरद पवार यावेळी म्हणाले. शरद पवार यांनी पहिल्यांदाच हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून २३ नोव्हेंबर २०१९ ला झालेला पहाटेचा शपथविधी चांगलाच चर्चेत आहे. या सगळ्याची शरद पवार यांना कल्पना होती, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मात्र ते असत्य असल्याचं शरद पवार म्हणाले होते. आता आज त्यांचं नवं वक्तव्य समोर आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar on early morning oath devendra fadnavis and ajit pawar rmm