राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपात घरवापसी होणार आहे. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली होती. दोन वर्षांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेची आमदारकीही देण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. या चर्चांवर बोलताना एकनाथ खडसे यांनी आपण लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते.
या सर्व घडामोडीनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशासंदर्भात भाष्य केले. “एकनाथ खडसे यांच्यावर नाईलाजाने निर्णय घेण्याची वेळ आली असावी”, असे शरद पवार म्हणाले.
हेही वाचा : “शरद पवारांनी शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय केला”; चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा
शरद पवार काय म्हणाले?
“एखाद्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका करण्याची भूमिका याआधी महाराष्ट्रात कधीही नव्हती. मात्र, ती आता सुरु झाली आहे. त्यामधून अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. कदाचित ही अवस्था एकनाथ खडसे यांच्यावरदेखील आली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर नाईलाजाने काही निर्णय घेण्याची वेळ आली असावी, असा माझा समज आहे. एकनाथ खडसे यांच्यावर तपास यंत्रणांचा दबाव आहे”, असे शरद पवार म्हणाले.
खडसेंनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला का?
एकनाथ खडसे हे सध्या राष्ट्रवादीत आहेत. मात्र, ते लवकरच भाजपात जाणार आहेत. यासंदर्भाने त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार म्हणाले, “मला याबाबत माहिती नाही. जयंत पाटील यांना माहिती असेल. ते संघटनेचे काम पाहतात. या भागात ज्यांचा प्रभावीपणे काम करण्याचा लौकीक आहे. त्यामध्ये एकनाथ खडसेदेखील आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सर्वांच्या प्रयत्नाने कोणाचीही उणीव आम्ही भरुन काढू”, असेही शरद पवार म्हणाले.