Sharad Pawar : विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या राज्यभरात विविध ठिकाणी सभा, मेळावे सुरु आहेत. या सभा आणि मेळाव्याच्या माध्यमातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात आहेत. त्यामुळे सध्या राज्यात वातावरण तापलं आहे. या दौऱ्यांच्या माध्यमातून विधानसभेच्या अनुषंगाने मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही करताना पाहायला मिळत आहेत. याच अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. तसेच “मी तुम्हाला शब्द देतो, एकदा राज्य हातामध्ये द्या, मग महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही”, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले?
“देशातील शेती खात्याचा कारभार १० वर्ष मी सांभाळला. ज्यावेळी माझ्याकडे शेतीखात्याचं काम आलं तेव्हा पहिलं काम माझ्याकडे आलं होतं की अमेरिकेतून गहू आयात करायचे. परदेशातून तांदूळ आणायचे. मला त्यावेळी दु:ख झालं. शेतकरी कुंटुबात माझा जन्म झाला. आई-वडील शेती करतात. हा देश बळीराजाचा देश आहे आणि असं असतानाही गहू आणि तांदुळा सारखं धान्य परदेशातून आणायचं. ही गोष्ट आपल्याला पटणारी नव्हती. त्यामुळे मी तेव्हा हे आव्हान स्वीकारलं. गव्हाची आणि तांदळाची किंमत वाढवली. मी १० वर्ष या खात्याचं काम पाहिलं आणि २०१४ मध्ये मी त्या खात्याचं काम सोडलं. त्यावेळी मला सांगायला अभिमान वाटतो की, भारत देश १० वर्षात जगातील गहू निर्यात करणारा दोन नंबरचा देश बनला. कृषीमंत्री असताना देशातील सर्व शेतकऱ्यांचं ७१ हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं”, असंही शरद पवार म्हणाले.
हेही वाचा: Sanjay Raut : “नितीन गडकरींना पंतप्रधानपदासाठी तडजोड..”, संजय राऊत यांचं वक्तव्य
“आज हाच तालुका कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा तालुका आहे. मात्र, या ठिकाणी काय दिसतं आहे? सत्तेचा गैरवापर सुरु झाला. गुंडगिरी सुरु झाली. खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ लागले आहेत. दमदाटी करण्याचे प्रकार वाढले. लोकांना तुरुंगात टाकण्याचे प्रकार होऊ लागले. मात्र, सत्ता ही लोकांच्या कामांसाठी असते. पण काही लोकांकडे सत्ता हातात आल्यानंतर सत्ता डोक्यात शिरते आणि सत्तेचा गैरवापर होतो. सध्या राज्याची सत्ता चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे. ती सत्ता उद्या संधी मिळाल्यानंतर त्यांच्या हातातून काढून घेणं आणि महाविकास आघाडीच्या हातात देणं हे काम तुम्हाला करायचं आहे. मी तुम्हाला शब्द देतो, एकदा राज्य हातामध्ये द्या, मग महाराष्ट्राचा चेहरा हा बदलल्याशिवाय राहणार नाही”, असंही शरद पवार म्हणाले.
© IE Online Media Services (P) Ltd