राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा ३ मे रोजी केली होती. परंतु कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानंतर शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे. शरद पवार यांनी आज मुंबईतला यशवंतराव प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. या पत्रकार परिषदेवेळी पवारांनी विविध राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तराधिकाऱ्याबाबत भाष्य केलं.
या पत्रकार परिषदेत शरद पवारांना विचारण्यात आलं की, तुम्ही गेल्या ६३ वर्षांपासून समाजकारणात आहात. तर ५६ वर्षांपासून तुम्ही मुख्य राजकारणात सक्रीय आहात. त्याचबरोबर २४ वर्षांहून अधिक काळ तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहात. इतक्या वर्षांमध्ये तुम्ही तुमच्यासाठी एक उत्तराधिकारी तयार करू शकला नाहीत, स्वतःचा बॅकअप तयार करू शकला नाहीत, याकडे कसं पाहता? यावर शरद पवार म्हणाले. इथे माझ्याजवळ बसलेले सर्वजण हा माझा बॅकअपच आहे. यावेळी पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल, आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक मोठमोठे नेते उपस्थित होते.
हे ही वाचा >> “मी भाकरी फिरवायला निघालो होतो, पण…”, शरद पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले…
शरद पवार म्हणाले, “ही सर्व मंडळी माझा बॅकअप आहेत. हे लोक राज्य चालवू शकतात, इतकंच काय देशही चालवू शकतात. यांना संधी मिळावी म्हणून तर मी मागे जाणार होतो. पण यांनी एकलं नाही, मी यावर काय करू?” तसेच शरद पवार त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबबातही बोलले. ते म्हणाले, “उत्तराधिकारी निर्माण करेन ही संकल्पना मी ठरवलेल्या गोष्टींपैकी नाही. मात्र, ही गोष्ट माझ्या मनात जरूर आहे की, संघटनेत काही नवीन सहकाऱ्यांना आणून संधी द्यायला हवी. याबाबत मी सहकाऱ्यांशी चर्चा करेन.”