उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. यात ६ शेतकरी होते. या मुद्द्यावरून देशातलं राजकारण तापलेलं असताना त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला सुनावलं आहे. “तुमच्या हाती कशासाठी सत्ता दिली याचं विस्मरणच भाजपाला झालेलं आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणावर देखील तीव्र शब्दांत टीका केली.

“देश शेतीप्रधान आहे. ६० टक्के लोक शेती करतात. सोलापूर एकेकाळचं औद्योगिक शहर. पण ती स्थिती इथे आता राहिलेली नाही. देशातले अनेक जिल्हे, राज्य शेती उत्पादनात अग्रेसर आहे. पण ज्यांच्या हातात देशाती सत्ता आहे, त्यांची शेतकरी आणि शेती व्यवसायाविषयी भूमिका काय आहे? त्यांना शेतकऱ्यांविषयी यत्किंचितही आस्था नाही”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

….याचं विस्मरण भाजपा सरकारला झालंय

“लखीमपूर खेरीमध्ये शेतकरी रस्त्यावर आले. आमच्या प्रश्नांकडे भाजपाचं सरकार दुर्लक्ष करतं याबद्दलची नापसंती व्यक्त करण्यासाठी ते आले. तिथे शेतकरी आल्यानंतर भाजपाचे नेते रस्त्याने जात असताना त्या शेतकऱ्यांच्या अंगावर त्यांनी गाड्या घातल्या. ८ लोक मृत्यूमुखी पडले. सर्वोच्च न्यायालयाने नोटीस काढून जे लोक मृत्यूमुखी पडले त्या सगळ्यांची माहिती मागवली आहे. लोकांनी हातात सत्ता लोकांचं भलं करण्यासाठी दिली आहे याचं विस्मरण भाजपा सरकारला झालं आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांची हत्या करण्याचं पाप केलं. याचा संताप पूर्ण देशात आहे”, असं शरद पवार म्हणाले.

केंद्राचा रस खासगीकरणात जास्त

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवारांनी केंद्र सरकारचा रस देशात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यापेक्षा आहे त्या सुविधांच्या खासगीकरणात जास्त असल्याची टीका केली. “त्यांचा रस देशातल्या रेल्वेस्थानकांची विक्री करून त्याचं खासगीकरण करणं यात आहे. ज्या देशात सुई तयार होत नव्हती, तिथे रेल्वेचं इंजिन तयार करण्याचं काम नेहरूंच्या काळात झालं. आज रेल्वे स्थानक, बंदर, विमानतळ या सगळ्याची विक्री करण्याचं काम राज्यकर्ते करत आहेत. त्याला विरोध करावा लागेल”, असं शरद पवार म्हणाले.

Story img Loader