विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडी वाढल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने जागावाटपाची तयारीही सुरु केली आहे. सर्वच नेते मंडळी सध्या मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. असे असतानाच आज भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला धक्का बसला. सुधाकर भालेराव यांच्या पक्ष प्रवेशाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं. तसेच लोकसभेतील महाविकास आघाडीच्या यशाबद्दल सांगत आता विधानसभेच्या निवडणुकीत २८८ जागांपैकी महाविकास आघाडीच्या २२५ जागा निवडून येतील, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

शरद पवार काय म्हणाले?

“लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी होत आहेत. महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला शक्ती द्यायला हवी हा विचार ज्यांच्या मनात आहे, असे अनेक लोक पक्षात सहभागी होत आहेत. त्यामुळे पक्षाच्या अनुषंगाने ही भाग्याची गोष्ट आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये एक शक्ती उभी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला आहे”, असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा : “दिवा विझताना फडफडतो, तशी शिंदे सरकारची अवस्था”, जयंत पाटलांची टीका; म्हणाले, “बादशाहच्या मनात आलं तर…”

“आजच्या या पक्ष प्रवेशाचं एक वैशिष्ट्य आहे. कारण यामध्ये प्रामुख्याने दोन ठिकाणचे सहकारी आहेत. उदगीर आणि देवळाली याठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते. मात्र, त्यांनी मतदारांचा घात केला. ज्यांनी त्यांना विधानसभेत पाठवलं त्यांची साथ त्यांनी सोडली आणि वेगळी भूमिका घेतली. तुम्ही मतं माघायला एका विचाराने येता आणि मतदान दिल्यानंतर तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जाता, हे वागणं शहाणपणाचं नाही”, अशा शब्दांत शरद पवार यांनी सुनावलं.

महाविकास आघाडी किती जागा जिंकेल?

“आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला आहात. त्यामुळे तुमची आणि माझी जबाबदारी वाढली आहे. ती जबाबदारी ही आहे की, महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने बदलाच्या अनुषंगाने निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये ४८ खासदार आहेत. पाच वर्षांपूर्वी जी निवडणूक झाली होती, त्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात विरोधकांचे फक्त ६ लोक निवडून आले होते. त्यामध्ये ४ राष्ट्रवादीचे होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत लोकांना सत्ताधाऱ्यांच्या कामाचा जो अनुभव आला तो अनुभव चांगला नव्हता”, असं शरद पवार म्हणाले.

“या लोकसभा निव़डणुकीत आपल्या विचाराच्या ३१ लोकांना जनतेनं निवडून दिलं. महाविकास आघाडीचे ३१ लोक निवडून आले, त्यामध्ये राष्ट्रवादीचे ८ जण आहेत. याचा अर्थ असा आहे की, ही फक्त सुरुवात आहे. यानंतर आता लवकरच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर होईल. तेव्हा २८८ जागांपैकी २२५ जागा महाविकास आघाडी जिंकेल, असं चित्र दिसत आहे. त्यामुळे आणखी जास्त काम करणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Story img Loader