बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ ‘कर्नाटक रक्षणा वेदिके’च्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी या प्रकरणावरुन २४ तासांच्या डेडलाइनचा उल्लेख करत कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडताना शरद पवारांनी केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीलाही लक्ष्य केलं.

“अशी अपेक्षा होती की दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती निवाळावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. पुढील २४ तासात परिस्थिती निवळली पाहिजे. तसं झालं नाही तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार रहातील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर भूमिका जर घडत असेल तर देशाच्या स्थैर्याला मोठा धक्का असेल,” असं म्हणत शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.

पवार यांनी केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीलाही लक्ष्य केलं. “केंद्राला बघ्याची भुमिका घेऊन चालणार नाही. उद्यापासून संसदीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्यातील सर्व खासदारांना आम्ही सांगणार आहोत की तुम्ही या विषयी भूमिका मांडा आणि हा विषय केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानावर घाला. आम्ही परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न करणार पण यश आलं नाही आणि कोणी कायदा हातात घेतला तर जबाबदारी केंद्र आणि कर्नाटक सरकारची असेल,” असंही पवार म्हणाले.

नक्की वाचा >> विश्लेषण: जाळपोळ, डॉक्टरांवर हल्ले ते महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक… ६० लाख सदस्य असलेल्या ‘कर्नाटक रक्षणा वेदिके’चा वादग्रस्त इतिहास

“जे काही गुजरातच्या, सोलापूर, जतच्या सीमेवर झालं ते काही आत्ताच का झाल्या? हा प्रश्न माझ्या कालखंडात कोणी मांडले नाहीत. आत्ताच कोणीतरी जाणीवपुर्वक चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. राज्य सरकार बघ्याची भुमिका घेत आहे. ठिक आहे आम्ही तिथे जाऊ, लोकांनी भेटू आणि धीर देऊ,” असं पवार म्हणाले. “दोन्ही सरकारे (दोन्ही राज्यांमधील तसेच केंद्रातील सरकार) त्यांचीच आहे. अजुनही आम्ही संयम दाखवत आहोत. दुर्देवाने हे अंसच सुरु राहीलं तर काय होईल सांगता येणार नाही,” असा इशारा शरद पवारांनी दिला.

“तिकडे निवडणुका आहेत का नाही माहिती नाही. पण माणसा माणसांमध्ये भाषिकांमध्ये कटुता रहाणे हे देशाच्या ऐक्या करता धोकादायक आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थाकरता करत असेल तर ते निषेधार्थ आहे,” असंही पवार म्हणाले. “या साऱ्याची सुरुवात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांच्या वक्तव्यांना कोणी प्रसिद्धी दिली असेल तर त्यांचा दोष नाही. बेळगावची चर्चा होती पण आता एकदम इतर ठिकाणची चर्चा काढली, एकदम वेगळे वळण मिळालं आहे,” असं पवार यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> विश्लेषण: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटणार तरी कधी? हा वाद काय आहे?

“इतका संयम दाखवून सुद्धा अशा गोष्टी घडत असतील तर लोकांचा उद्रेक कुठेही जाऊ शकतो, तो जाऊ नये याचा आमचा प्रयत्न आहे,” अशी भूमिका पवारांनी मांडली. “एकीकरण समितीच्या लोकांचे मला फोन आले. या सगळ्या गोष्टी राज्य सरकार काय करते हे बघुन चालणार नाही. हे प्रकरण ४८ तासात संपलं नाही तर माझ्यासकट सर्वांना तिथे धीर देण्यासाठी जावे लागेल,” असं पवारांनी सांगितलं.

Story img Loader