Sharad Pawar On Local Body Election : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र, महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला. महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे. दरम्यान, दुसरीकडे महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर आघाडीतील नेत्यांकडून पराभवाची कारणं काय? यावर विचारमंथन करण्यात येत आहे.
यातच विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे महाविकास आघाडीचं भविष्य काय? असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून अनेकदा विचारला जातो. यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची पुढील रणनीती काय असेल? यावर भाष्य केलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?
विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश आलं. आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. मग आता पुढच्या काळात महाविकास आघाडीची रणनीती काय असेल? असा प्रश्न पत्रकार परिषदेत शरद पवार यांना विचारला असता ते म्हणाले की, “आम्ही सर्व एकत्रित आगामी निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. निवडणुकीत जय आणि पराजय होत असतात, त्यामुळे ना उमेद व्हायचं नसतं. मी आयुष्यात १४ निवडणुका लढलो. मी कधी पराभव पाहिला नाही. मात्र, या निवडणुकीत राज्यात आम्हाला पराभव पाहायला मिळाला. जरी पराभव झाला असला तरी त्याची चिंता करायची नाही. लोकांमध्ये जायचं आणि काम करायचं. आज लोक देखील अस्वस्थ असल्याचं दिसंत. लोकांमध्ये उत्साह दिसत नाही. कारण निवडणुका झाल्यानंतर एक वातावरण असतं ते वातावरण महाराष्ट्रात दिसत नाही”, असं शरद पवार म्हणाले.
ईव्हीएमसंदर्भात शरद पवार काय म्हणाले?
“ईव्हीएमवर आमची शंका नाही. कारण त्यासंबंधी ठोस असे पुरावे माझ्या हातात नाहीत. पण मतदानाच्या आकडेवारीवरून काही प्रश्न निर्माण होत आहेत. काँग्रेस पक्षाला ८० लाख मते पडली आणि त्यांचे फक्त १६ आमदार निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाला ७९ लाख मते मिळाली आहेत, तर त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही जवळपास ४१ आमदार अधिक निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मते ७२ लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त १० आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ५८ लाख एवढे मतदान मिळाले, पण त्यांचे ४१ आमदार निवडून आले आहेत.”