Sharad Pawar On Mamata Banerjee : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे इंडिया आघाडीतील काही पक्ष काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीबाबत चिंता व्यक्त केली. तसेच इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत ममता बॅनर्जी यांना थेट इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याचा दावा केला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या इंडिया आघाडीच्या नेतृत्व करण्याच्या विधानानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया देत मोठं विधान केलं आहे. ममता बॅनर्जींमध्ये इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं शरद पवारांनी कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे. शरद पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा : विधानसभेतील पराभवानंतर आता ‘मविआ’चं भविष्य काय? शरद पवारांनी सांगितली पुढची रणनीती; म्हणाले, “आम्ही सर्व…”
शरद पवार काय म्हणाले?
ममता बॅनर्जी यांनी असं म्हटलं आहे की इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. यावर तुमचं मत काय? असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता ते म्हणाले की, “आहेच. असं आहे की, ममता बॅनर्जी या देशाच्या एक प्रभावी नेत्या आहेत. त्यांच्याकडे ती (इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची) क्षमता आहे. आज देशाच्या संसदेत त्यांनी जे लोक निवडून पाठवलेत ते अतिशय कर्तबगार, कष्टाळू आणि जागरूक आहेत. त्यामुळे त्यांना (ममता बॅनर्जी) तसं म्हणण्याचा अधिकार आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी नेमकी काय म्हटलं होतं?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीबाबत चिंता व्यक्त केली. इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, “मला संधी दिल्यास मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यास तयार आहे. मी सक्षमपणे आघाडीचं नेतृत्व करेन. मी इंडिया आघाडी बनवली होती. जे लोक या आघाडीचं नेतृत्व करत आहेत त्यांनी ही आघाडी सांभाळली पाहिजे, अधिक सक्षम केली पाहिजे. परंतु, त्यांना ती आघाडी सांभाळता येत नसेल तर त्यात मी काय करू शकते. मी फक्त एवढंच सांगेन की सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे, सर्वांनी एकजुटीने पुढे जायला हवं”, असं ममता बॅनर्जी यांनी न्यूज १८ बांगला या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.