Sharad Pawar On Marathi Sahitya Sammelan : दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाला महाराष्ट्रासह दिल्लीत राहणाऱ्या मराठी माणसांनी मोठा प्रतिसाद दिला. मात्र, या मराठी साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर एक आरोप केला. त्यांच्या आरोपावरून चांगलंच राजकारण तापलं. नीलम गोऱ्हे यांच्या विधानावरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. तसेच संजय राऊत यांनी शरद पवार यांनाही काही सवाल केले. या आरोप-प्रत्यारोपामुळे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप अनेकांनी केला. या आरोपासंदर्भात शरद पवार यांना आज पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर शरद पवार यांनी उत्तर देत आपल्याला हा आरोप मान्य नसल्याचं सांगितलं. तसेच मराठी साहित्य संमेलनात कोण आणि किती राजकीय मंडळी होते? साहित्य संमेलनात कोणते कार्यक्रम झाले आणि त्यासाठी कोण कोण उपस्थित होतं? याची यादीच शरद पवार यांनी वाचून दाखवली.

शरद पवार काय म्हणाले?

“साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय वापर झाला असा आरोप होत आहे, तो आरोप मला मान्य नाही. त्याचं कारण म्हणजे आपण जर साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची पत्रिका पाहिली तर त्यामध्ये साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीत कोणीही राजकीय नव्हतं. फक्त उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी (शरद पवार) आणि देवेंद्र फडणवीस होते. तसेच साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमातील पुढच्या सत्रामधील मग त्यामध्ये मराठी पाऊल पडते पुढे, मन मोकळा संवाद, कमी संमेलन, मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म, यासह आदी कार्यक्रमाची यादी आपण पाहिली तर फक्त दोन ते तीन ठिकाणीच राजकीय मंडळी दिसतात. त्यामुळे फारसं कोणी राजकारणातलं नव्हतं”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नीलम गोऱ्हे यांच्या विधानाबाबत शरद पवार काय म्हणाले?

“नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात जे विधान केलं त्याची काही आवश्यकता नव्हती. नीलम गोऱ्हे यांना चारवेळा आमदारकी मिळाली आहे. त्यांना या चारही टर्म कशा मिळाल्या या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांनी मला वाटतं कुठल्याश्या कारचा उल्लेख केला तो करायला नको होता. नीलम गोऱ्हे यांनी असं बोलायला नको होतं. नीलम गोऱ्हे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होत्या. त्यानंतर त्या शिवसेनेत होत्या, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्या काम करत होत्या. त्यानंतर आता हल्ली त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत काम करत आहेत. एका मर्यादित कालावधीत त्या जवळपास चार पक्षांचा अनुभव त्यांनी घेतला आहे. त्यांचा जो काही अनुभव लक्षात करायला त्यांनी ते भाष्य केलं नसतं तर योग्य ठरलं असतं. यासंबंधी संजय राऊत यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. संमेलनाचे जे आयोजक आहेत त्यांनीही नापसंती व्यक्त केली आहे. त्या सगळ्यावर आता पडदा टाकायला हरकत नाही.”

नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या होत्या?

“कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचं काही कारण नाही. २०१२ वगैरे पर्यंत मी पाहात आले आहे की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की संपर्क नको असेल नेत्यांना तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर अवनती होत गेली”, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या.

Story img Loader