राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमधील विविध गावांचा दौरा करत शेतकरी मेळावा घेत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत लोकांचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असल्याचं सांगितलं. तसेच भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही. पंतप्रधान मोदींची गॅरंटी खोटी निघाली. त्यामुळे भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या विश्वासाला तडा बसला आहे, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुष्काळी दौऱ्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, “हा दौरा करत असताना अनेक लोकांनी अनेक प्रश्न मला सांगितले. त्याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांना मी एक पत्र पाठवलं आहे. त्या पत्रामध्ये दुष्काळासह बाकी काही प्रश्न आहेत. या प्रश्ना संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलणार आहे. दौऱ्यात ज्या काही गोष्टी निदर्शनास आल्या त्याबाबत मी एक बैठक घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे विनंती करणार आहे. दुधाच्या प्रश्नासंदर्भातही काही प्रश्न आहेत. दुधासाठी येणारा खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे दुधाची किंमत पाच रुपये प्रतिलटर प्रमाणे वाढून देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करणार आहे”, असंही शरद पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : “विखे कुटुंबियांचा मला अभिमान”, निलेश लंकेंचं विधान चर्चेत; म्हणाले, “राधाकृष्ण विखेंचा आशीर्वाद…”

विरोधीपक्ष नेता कोण असणार?

केंद्रात एनडीएच सरकार स्थापन झाल्यानंतर आता इंडिया आघाडीचा विरोधी पक्षनेता कोण असणार?, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, “लवकरच संसदेचं अधिवेशन सुरु होणार आहे. त्यावेळी यासंदर्भात चर्चा होईल. आम्ही यासंदर्भात आता चर्चा केली नाही. काहीही झालं लोकसभा निवडणुकीत ज्यांच्या जास्त जागा आहेत. त्यांना हे पद द्यावं, अशी चर्चा याआधी एकदा झाली होती. आता जास्त जागा या काँग्रेसच्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरवेल की कोणाला विरोधी पक्षनेता करायचं. काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्णयाला आम्ही सहमती देऊ”, असं शरद पवारांनी सांगितलं.

मोदींची गॅरंटी खोटी

“भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारच्या विश्वासाला तडा बसला आहे. मोदी कायम सांगत होते की मोदींची गॅरंटी. मात्र आता मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा विश्वास राहिला नाही, हे या निवडणुकीत दिसलं आहे. मोदींची गॅरंटी खोटी निघाली. त्यांनी जे आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण केले नाही”, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला.

छगन भुजबळांबाबत काय म्हणाले?

छगन भुजबळ म्हणतात की, मी राष्ट्रवादी बरोबर आहे. दादांबरोबर नाही. त्यांच्या या विधानाचा अर्थ काय घ्यायचा? भुजबळांचे परतीचे संकेत दिसत आहेत का? या प्रश्वार शरद पवार म्हणाले, “याबाबत मला काही माहिती नाही. त्यांच्या या विधानाची पार्श्वभूमी काय? मला माहिती नाही. माझी त्यांची सहा महिन्यात भेट नाही. त्यामुळे मला त्याबाबत काही माहिती नाही”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar on narendra modi lok sabha elections and modi ki guarantee bjp and chhagan bhujbal gkt