Vidhan Sabha Election 2024: विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत. या सभेच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी नेते जनतेला आवाहन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या बरोबरच प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. परळी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राजेसाहेब देशमुख हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात धनंजय मुंडे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता शरद पवारांनी आज परळीत झालेल्या सभेत बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात तीन नेत्यांचा प्रामुख्याने सहभाग होता, असा आरोप परळीत बोलताना शरद पवारांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात कोणत्या तीन नेत्यांचा प्रामुख्याने सहभाग होता? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात असून शरद पवारांचा रोख नेमकी कुणाकडे आहे? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा : ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी

शरद पवार काय म्हणाले?

“काही लोकांनी पक्ष फोडायचं काम केलं. पक्ष फोडणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीत तीन लोक प्रामुख्याने होते. ते सहकाऱ्यांमध्ये गैरविश्वास मांडू लागले. ते दोन-तीन लोक कोण आहेत? हे सांगण्याची मी आवश्यकता नाही. अशा व्यक्तींना उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मतांनी पराभूत करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. त्यांचा पराभव करा आणि राजेसाहेब देशमुख यांना निवडून द्या”, असं शरद पवार सभेत बोलताना म्हणाले.

‘सत्तेची हवा डोक्यात गेली’

“काही लोकांना राजकीय संकटात मदतीची आवश्यकता होती. त्यावेळी माझ्याकडून त्यांना मदत केली गेली. मला आठवतं की मुंबईला माझ्या घरी पंडित अण्णा आणि धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते. तेव्हा पंडित अण्णांनी सांगितलं की, आमच्या काही अडचणी आहेत. त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तुमची मदत आम्हाला पाहिजे. त्यांना पक्षात घेतलं. संघटनेची जबाबदारी दिली. विधानपरिषदेचं आमदार केलं. विरोधी पक्षनेते केलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहभागी केलं. त्यांच्यासाठी जे-जे करता येईल ते केलं. या लोकांना सत्ता दिली. पण त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली, असं म्हणत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला.

राजेसाहेब देशमुख काय म्हणाले?

“कोणाचाही नाद करायचा पण शरद पवारांचा नाद करायचा नाही. मंत्री महोदय (धनंजय मुंडे) तुम्ही आता शरद पवारांचा नाद केला आहे तर तुम्हाला आता हबाडा दिल्याशिवाय शरद पवार थांबणार नाहीत. परळीची जनताही थांबणार नाही”, असा इशारा राजेसाहेब देशमुख यांनी परळीतील सभेत बोलताना दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar on ncp crisis dhananjay munde parli assembly politics dhananjay munde vs rajesaheb deshmukh vidhan sabha election 2024 gkt