नागालँडमध्ये अलीकडेच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत एनडीपीपी-भाजपाप्रणित आघाडीला ३७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तर, ७ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिसऱ्या स्थानावर आहे. अशातच राष्ट्रवादीने एनडीपीपी-भाजपा युतीला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“नागालँडमध्ये निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ विधानसभा सदस्य निवडून आले. निवडणुकीच्या काळात तेथील मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा होता. आमचा पाठिंबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आहे, त्यामुळे भाजपाबरोबर आम्ही युती केली नाही,” अशी स्पष्टोक्ती शरद पवारांनी दिली आहे.
हेही वाचा : “माझ्या जन्माच्या तिसऱ्या दिवशी आईने सभागृहात नेलं होतं, त्यामुळे…”, शरद पवारांनी दिला आठवणींना उजाळा
“नागालँडमधील चित्र बघितल्यानंतर तेथे एकप्रकारे राजकीय स्थैर्य येण्यासाठी आमची मदत मुख्यमंत्र्यांना होत असेत, तर आमचा पाठिंबा आहे. मात्र, भाजपाला आमचा पाठिंबा नाही. मेघालय आणि शेजारील राज्यात निवडणुका पार पडल्या. तिथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह दोघेही गेले होते. पंतप्रधानांनी मेघालयाच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावत पराभव करण्याचं आवाहन केलं होतं,” असं शरद पवारांनी सांगितलं.
“मात्र, निवडणूक झाल्यावर पंतप्रधान त्यांच्या शपथविधीला ते सहभागी झाले. तसेच, आपल्या सहकाऱ्यांनाही मंत्रिमंडळात सहभागी केलं. ती भूमिका आम्ही घेतली नाही,” असं शरद पवारांनी म्हटलं.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंची पंतप्रधानपदाबाबत चर्चा असल्याचं विचारताच नारायण राणेंनी जोडले हात; म्हणाले…
तसेच, “राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेण्याची आमचं चालू आहे. दोन दिवसांत संसदेचं अधिवेशन सुरु होईल. तेव्हा मित्र पक्षाशी चर्चा करणार आहे,” असं शरद पवार म्हणाले.