महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंनी पुकारलेलं बंड आणि त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार सत्तेत आले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी मागील आठवड्यात नागपूर दौरा केला. मतदारांचे आभार मानण्यासाठी फडणवीसांनी नागपूर दौरा केल्याचं सांगितलं. या दौऱ्यादरम्यान प्राकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी फडणवीसांचं अभिनंदन करणाऱ्या बॅनर्सवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे फोटो दिसत नव्हते. हा विषय राजकीय वर्तुळामध्ये चांगलाच चर्चेत आहे. असं असतानाच आता यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलीय.
नक्की वाचा >> सकाळीच आलेला अमित शाहांचा फोन, मराठा- ब्राह्मण समीकरणं अन् फडणवीसांच्या हातून निसटलेलं मुख्यमंत्रीपद; जाणून घ्या घटनाक्रम
प्रकरण काय?
देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्याआधीच नागपूरमध्ये लावण्यात आलेल्या काही बॅनर्सवरुन अमित शाहांचा फोटो गायब होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आल्यानंतर फडणवीस समर्थक माजी महापौर संदीप जोशी यांनी १ जून रोजी म्हणजेच फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शहरातील विविध भागात फडणवीस यांचे अभिनंदन करणारे फलक लावले होते. मात्र त्या फलकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे छायाचित्र न वापरून एकप्रकारे नाराजी व्यक्त केली होती.
फडणवीस यांचे खंदे समर्थक असलेल्या संदीप जोशी यांनी शहरातील विविध भागात अभिनंदन करणारे फलक लावले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील. चंद्रशेखर बावनकुळे व प्रवीण दटके यांचे छायाचित्र आहे. मात्र केंद्रात दुसऱ्या क्रमांकाचे नेते असलेल्या अमित शाह यांचे छायाचित्र वगळत नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे.
पाहा व्हिडीओ –
नक्की वाचा >> २०० आमदार निवडून आणण्याच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “मला वाटतं त्यांचं चुकलं काहीतरी, आपली…”
अमित शाह जबाबदार असल्याची चर्चा
फडणवीस यांनी युतीचे सरकार असताना पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार चालवला. गेल्या अडीच वर्षांपासून विरोधी पक्षनेते म्हणून दमदार भूमिका निभावली. नुकत्याच झालेल्या राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडीचे बहुमत असताना भाजपाला यश मिळवून दिले. यासाठी फडणवीस यांचे कौतुकही झाले. शिवसेनेत फूट पाडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे पुन्हा फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होणार असे समजून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. अनेकांनी फलकही तयार केले होते. जल्लोषाची तयारी केली होती.
नक्की वाचा >> फडणवीसांनी उपमुख्यंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंचं पत्र; म्हणाले “ही बढती आहे की…”
मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा फडणवीस यांनी केल्यानंतर काही वेळातच फडणवीस यांच्या डोक्यावर उपमुख्यमंत्रीपदाचा मुकुट चढवण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने आग्रह धरला. त्यामुळे भाजपाचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. फडणवीस मुख्यमंत्री न होण्याला केंद्रीय गृहमंत्री जबाबदार असल्याचे भाजपाचे कार्यकर्ते बोलू लागले. असाच काहीसा प्रकार फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दिसला. अनेक बॅनर्सवर अमित शाह यांचे फोटो गायब असल्याचं दिसलं.
नक्की वाचा >> संजय राऊतांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक; म्हणाले, “आता जे मुख्यमंत्री झालेत ते…”
शरद पवार काय म्हणाले?
याच नाराजी नाट्यावरुन शरद पवार यांना रविवारी म्हणजेच १० जुलै रोजी औरंगाबदमधील पत्रकारपरिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. देवेंद्र फडणवीसांची जी स्वागत यात्रा निघाली त्यादरम्यान जे बॅनर होते त्यावर अमित शाहांचा फोटो नव्हता, असं म्हणत पत्रकारांने हा विषय शरद पवारांसमोर काढला. त्यावर पवार यांनी थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. पवार यांनी हा प्रश्न टाळताना, “त्याच्यात कोणाचा फोटो होता, कोणाचा नव्हता हे काय मी बघायचं का?”, असा प्रतिप्रश्न पत्रकाराला केला. त्यानंतर पवार यांनी पुढील प्रश्नाकडे वळताना, “ठीक आहे असेल नसेल काही…” असं म्हणत अमित शाहांचा फोटो लावायचा की नाही हा फडणवीस समर्थकांचा खासगी प्रश्न असल्याचे संकेत देणारं विधान केलं.