राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुण्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट झाली. या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. शरद पवारांच्या भूमिकेवर संभ्रम फार काळ राहता कामा नये, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. या विधानावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत काय म्हणाले?
“शरद पवारांच्या भूमिकेवर संभ्रम फार काळ राहता कामा नये. जो संभ्रम निर्माण झालाय, पुन्हा एकदा आणि वारंवार होतोय. लोकांच्या मनात संभ्रम राहिला, तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो,” असं संजय राऊतांनी म्हटलं होतं. मात्र, “स्पष्टीकरण दिल्यानंतर संभ्रम निर्माण करू नका,” अशी विनंती शरद पवारांनी केली आहे.
हेही वाचा : “भीष्म पितामहांकडून ही अपेक्षा नाही”, संजय राऊतांनी थेट शरद पवारांना केलं लक्ष्य! नेमकं काय झालं?
शरद पवार म्हणाले, “संभ्रम वगैरे काही नाही. महाविकास आघाडी विचाराने एकत्र आहे. देशात आणि राज्यात ज्यांची भूमिका भाजपाशी संबंधित आहे. त्या घटकांशी आमचा कोणत्याही संबंध असल्याचं कारण नाही. ही भूमिका स्पष्ट झाल्यानंतर संभ्रम राहिला नाही. एकदा गोष्ट स्पष्ट केल्यानंतर पुन्हा-पुन्हा संभ्रम निर्माण करू नका.”
हेही वाचा : “दोन पवारांची ‘गंमतभेट’ अन् मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हा वैयक्तिक प्रश्न, पण…”, ठाकरे गटाने सुनावलं
“जयंत पाटलांच्या बंधूंना ईडीची नोटीस आल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे. सत्तेचा गैरवापर करून ही पावले टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांना अशा काही नोटीसा आल्यानंतर ते भाजपाबरोबर जाऊन बसले. तसेच, आता जयंत पाटलांबाबत करण्याची भूमिका घेण्यात आल्याचं दिसत आहे,” अशी टीका शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केली आहे.