गेल्या तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरी ही सुनावणी चालू असून शिवसेनेचा व्हीप मोडल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हे आमदार अपात्र ठरले, तर राज्याच्या राजकारणात काय घडणार? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. त्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात केलेल्या विधानामुळे त्यात अधिकच भर पडली आहे. पण याबाबत शरद पवारांनी आज माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी चर्चा काय?

सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरील निकाल अजून आलेला नाही. सुनावणीत पहिले तीन दिवस ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडल्यानंतर आता २८ फेब्रुवारीपासून शिंदे गटाचे वकील बाजू मांडतील. मात्र, जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिंदे गटाच्या विरोधात गेला आणि आमदार अपात्र ठरले तर राज्यात राजकीय परिस्थिती कोणत्या दिशेला बदलेल? याबाबत चर्चा चालू आहे. यावर गुरुवारी रात्री कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झालेले ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या सूचक विधानामुळे चर्चेची राळ उठली आहे.

उद्धव ठाकरेंचं सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर मोठं विधान; आमदार अपात्रतेचा संदर्भ देत म्हणाले, “राज्यात…!”

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरेंनी यावेळी राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता बोलून दाखवली आहे. “कसब्यात काँग्रेस आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी यांना आपल्याला विजयी करावंच लागेल. माझा अंदाज आहे की विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागेल, लागू शकेल. कारण अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. ते जर उडाले तर आपल्या राज्यात मध्यावधी लागू शकतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तेव्हाच आम्ही…”, शिंदे गटाच्या आमदारांचं सूचक विधान; सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीवर भाष्य!

शरद पवारांचं सूचक विधान!

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी एमपीएससी परीक्षार्थींशी संवाद साधला. यानंतर माध्यमांशी केलेल्या चर्चेमध्ये पत्रकारांनी उद्धव ठाकरेंच्या विधानाबाबत शरद पवारांना विचारणा केली असता त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली. “उद्धव ठाकरेंनी कशाच्या आधारे हे वक्तव्य केलं हे मी जाणून घेतलेलं नाही. पण मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील असं मला वाटत नाही. मला तरी आत्ता तशी स्थिती आहे असं वाटत नाही”, असं शरद पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar on uddhav thackeray claim mla disqualification mid election in maharashtra pmw