महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या आवडत्या नेत्याबद्दल विधान केलं आहे. राज ठाकरेंचे आवडते नेते कोण? शरद पवार की नरेंद्र मोदी? रॅपिड फायरमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी वेगळ्याचं नेत्याचं नाव घेतलं आहे. यावेळी त्यांनी शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या कामाची तुलना केली आहे. ते ‘लोकमत’च्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी त्यांची मुलाखत घेतली.
या मुलाखतीत अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंना रॅपिड फायरमध्ये विविध प्रश्न विचारले. यावर राज ठाकरेंनी सडेतोड उत्तरं दिली. यावेळी अमोल कोल्हे यांनी “राज ठाकरेंचे आवडते नेते कोण? शरद पवार की नरेंद्र मोदी?” असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, “खरं तर, मला यातलं फार कुणी आवडत नाही. आजपर्यंत मी ज्यांना मानत आलो, ते बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांच्याकडेच मी नेहमी आदराने पाहत आलो.”
“आवडणं यापेक्षा मी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या कामाची तुलना करू शकतो. नरेंद्र मोदी आणि शरद पवारांबद्दल सांगायचं झालं तर दोघंही कामाला ‘वाघ’ आहेत. मला एखाद्या नेत्याची राजकीय भूमिका न आवडणं किंवा न पटणं, हे स्वाभाविक आहे. त्यासाठी आपण व्यक्तीवर फुली मारत नाही,” अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली.
राज ठाकरे पुढे म्हणाले, “जेव्हा मी नरेंद्र मोदींवर टीका करत होतो, ती टीका पोटतिडकीने करत होतो. पण ती टीका नरेंद्र मोदी या व्यक्तीवरची नव्हती, त्यांच्या भूमिकेवरची होती. उद्या मी जेव्हा शरद पवारांवर टीका करेन, तेव्हा ती टीका व्यक्तीवरची नसते, ती त्यांच्या भूमिकेवरची असते. त्या भूमिकेला माझा विरोध असतो. पण जेव्हा मी एखाद्या गोष्टीचा विरोध करतो, तेव्हा मी त्यामध्ये १०० टक्के टाकलेले असतात.”