राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सृजन संस्थेकडून ‘गड किल्ले बांधणी महास्पर्धा-२०२२’ चे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेलं पोस्टर आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या स्पर्धेचं पोस्टर डिझाइन करत असताना शरद पवारांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरच्या बाजुला लावण्यात आला आहे. यावर काहीजणांनी आक्षेप घेतला आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनीही हा फोटो शेअर करून ‘शिवाजी महाराजांपेक्षा मोठं कोण? असा सवाल विचारला आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी ट्वीट करत जाहीर माफी मागितली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवराय, महात्मा फुले आणि महाराष्ट्राचा अवमान केला तेंव्हा गप्प बसणारे आज बोलायला लागले, याचं समाधान आहे, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे.
रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “समता, बंधुता, एकता व धर्मनिरपेक्षतेचं स्वराज्य स्थापन करणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उंचीची जगात कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. मुळात महाराजांच्या उंचीची तुलना करणं हेच आक्षेपार्ह आहे. तरीही सदरील डिझाईनमुळं शिवप्रेमींना दुःख झालं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.”
हेही वाचा- “आधी बेशरमपणा करायचा आणि नंतर…” आदित्य ठाकरेंचा छत्रपतींसोबतचा फोटो पाहून अतुल भातखळकरांचा संताप
“पण यानिमित्ताने महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी छत्रपती शिवराय, महात्मा फुले आणि महाराष्ट्राचा अवमान केला तेव्हा गप्प बसणारे आज बोलायला लागले, याचं समाधान आहे” असा टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे.