सांंगली : सांगलीचे लोक मोठे चमत्कारिक आहेत. कधी काय करतील याचा नेम नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जयंत पाटलांची उंची खूप मोठी आहे, त्यांना साथ द्या, असे भावनिक आवाहन केले.
महापालिकेने स्व. बाळासाहेब ठाकरे चौकात उभारलेल्या लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मंगळवारी सायंकाळी शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी स्वागत केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी आमदार डॉ. विश्वजित कदम, विक्रम सावंत, अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, अरूण लाड, सुमनताई पाटील यांच्यासह वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आदी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांत महापालिका क्षेत्रातील आमदार पाटील यांचे समर्थक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आले असून या गटाच्या प्रवेशाच्या तयारीत आहेत. यामुळे निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमध्ये शरद पवार यांनी सांगलीतील कार्यकर्त्यांना जयंत पाटील यांच्या सोबत राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, जुन्या सातारा जिल्ह्यातील सांगलीमधील अनेक मंडळी स्वातंत्र्य संग्रामात आघाडीवर होती. हा जिल्हाच चमत्कारिक असून येथील लोक कधी काय करतील हे सांगता येत नाही. देशातील पहिली सर्कस असलेल्या तासगावमधील लोक वाघाच्या जबड्यात हात घालत होते. मात्र, स्वाभिमानाला कधी तडा जाऊ दिला नाही. राजारामबापूसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांचा लोकसंपर्क मोठा होता. राज्यात औद्योगिक वसाहती उभारण्यावेळी उर्जा मंत्री म्हणून बापूंचे योगदान मोठे आहे, असेही त्यांनी सांगितले. वसंतदादा व राजारामबापू यांच्यात मतभेद जरूर होते. मात्र, ते विधायक स्वरुपातच होते. दोघांनीही विकासाची कामे केली, मात्र, यामध्ये वसंतदादा सत्तेत होते, तर बापू विरोधात होते. हा फरक होता असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पुतळा अनावरण झाल्यानंतर वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील या व्यासपीठावर उपस्थित न राहता परस्पर निघून गेले. तर अजितदादा गटात सहभागी झालेले माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी हे आवर्जून यावेळी उपस्थित होते.