Sharad Pawar Praises RSS Jitendra Awhad Explains : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. तर त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीची दाणादाण उडाली. त्यांच्या या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील मोठा वाटा आहे, ही गोष्ट आता भाजपाबरोबरच त्यांचे विरोधकही बोलू लागले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाची मुंबईत नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी संघाचे कौतुक केलं. तसेच संघाप्रमाणेच आपल्या कार्यकर्त्यांनी देखील आगामी निवडणुकांमध्ये काम करायला हवं हे नमूद केलं. शरद पवार म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत संघाने प्रचाराची योग्य रणनीती आखली होती. त्यामुळे विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं”. शरद पवारांनी संघाचे कौतुक केल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महायुती आणि शरद पवारांच्या पक्षात जवळीक वाढतेय का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
शरद पवार म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत संघ स्वयंसेवकांनी त्यांच्या विचारसरणीवर निष्ठा व वचनबद्धता दाखवून काम केलं. आपणही राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीला अनुसरून एक मजबूत व वचनबद्ध केडर तयार करण्यासाठी काम केलं पाहिजे. दरम्यान, पवारांच्या या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली असून आमदार जितेंद्र आव्हाडांनी त्यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शरद पवारांनी संघाचा संदर्भ केवळ एक उदाहरण म्हणून दिला. त्यांच्या केडरची वचनबद्धता व निष्ठेबद्दल एक उदाहरण दिलं. याचा अर्थ असा नव्हे की शरद पवार किंवा आमचा पक्ष संघाचं अथवा त्यांच्या विचारसरणीचं कौतुक करतो. त्यामुळे त्यावर आता अधिक राजकीय चर्चा केली जाऊ नये”.
हे ही वाचा >> Amit Shah : अमित शाह यांची टीका, “सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने…”
भाजपाच्या विजयात संघाची भूमिका महत्त्वाची
एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपासह महायुती राज्यातील ४८ पैकी केवळ १७ जागा जिंकू शकली. त्याच महायुतीने सहा महिन्यांनंतर झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २३७ जागा जिंकल्या आहेत. निवडणूक प्रचारात संघाची भूमिका महत्त्वाची ठरली. लोकसभा निवडणुकीत राज्यात संघाने महायुतीसाठी फार प्रयत्न केले नव्हते. विधानसभेला मात्र त्यांचं केडर कामाला लागलं. म्हणूनच त्यांना इतका मोठा विजय मिळवता आला असं राजकीय विश्लेषक सांगतात.
हे ही वाचा >> लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा; योजना बंद होणार? उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सत्तेपर्यंत…”
विरोधकांच्या नरेटिव्हविरोधात भाजपाला संघाची मदत
विधानसभा निवडणुकीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा व महायुतीच्या प्रचाराची रणनीती आखण्यसाठी संघातील नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या अर्धा डझनहून अधिक बैठका घेतल्या होत्या. ते संघाशी सातत्याने सल्लामसलत करत होते. देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं होतं की विरोधकांनी लोकसभेवेळी देशात फेक नरेटिव्ह (अपप्रचार) पसरवलं आहे, ते आपल्याला खोडून काढावं लागेल. यासाठी फडणवीसांनी संघाची मदत घेतली. एकट्या भाजपाने राज्यात १४९ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १३२ जागांवर त्यांनी विजय मिळवला आहे. तर, शिवसेनेने ५७ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ४१ जागा जिंकल्या आहेत.