राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची पहिली भेट झाल्यानंतरच पडद्याआड बरंच काही शिजत असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रीय स्तरावर बिगरभाजप महाआघाडीच्या पर्यायाची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली. याचसंदर्भात शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीवरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा सोमवारी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. याआधी ११ जून रोजी मुंबईतही प्रशांत किशोर यांनी पवारांशी तीन तास चर्चा केली होती. सोमवारी झालेल्या बैठकीनंतर आज शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांतील नेत्यांची बैठक होत असून, या सर्व घडमोडींवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून निशाणा साधला.

हेही वाचा- पवारांसोबतच्या बैठकीत नक्की काय चर्चा झाली?; प्रशांत किशोर यांनी केला मोठा खुलासा

“भारतीय राजकारणातील चाणक्य (स्वयंघोषित) आणि भावी पंतप्रधान (हेही स्वयंघोषितच) यांनी दिल्लीत बैठक घेतली. त्यात जावेद अख्तरही होते. ‘शोले’चा रिमेक करण्याचा विचार आहे म्हणे… त्यात ‘अन्ग्रेजो के जमाने के जेलर’च्या भूमिकेत संजयच हवा असा हट्टच साहेबांनी धरल्याची चर्चा आहे,” असा टोला अतुल भातखळकर यांनी शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.

१५ पक्षांना निमंत्रण

’माजी केंद्रीय मंत्री व मोदींचे विरोधक मानले जाणाऱ्या यशवंत सिन्हा यांच्या ‘राष्ट्र मंच’ या बिगरराजकीय संस्थेने ही बैठक आयोजित केली आहे. ’समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आदी १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. ही बैठक बिगरभाजप आघाडीच्या शक्याशक्यतेवर चर्चा करण्यासाठी होत असली तरी, काँग्रेसला वगळून भाजपविरोधी आघाडी तयार करण्याबाबत शरद पवार वा अन्य विरोधी पक्ष नेत्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.

Story img Loader