कराड : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लोकसभेच्या माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते-पाटील आणि साताऱ्यातून शशिकांत शिंदे हे दोन्ही उमेदवार एक लाखाच्या मताधिक्याने जिंकतील असा दावा करताना, खासदार शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महाविकास आघाडी’चे माढा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ दहिवडीमध्ये जाहीर सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील उत्तम जानकर, अनिल देसाई, अभयसिंह जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा…“पंतप्रधान मोदी विश्वनेते, कुणीही नाद करायचा नाही”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा

पवार म्हणाले की, देशाची लोकशाही वाचविण्यासाठी, नरेंद्र मोदी आणि अमित शहांची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी, देशाचे संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना घरी बसविण्यासाठी, महागाई वाढवून गोरगरिबांचे कंबरडे मोडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सत्ता बदल करावा.

माढा आणि साताऱ्याचे आपले उमेदवार हे कर्तबगार, अन्याया विरोधात चिडून उठणारे, जनतेच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे उमेदवार मतदारसंघाच्या विकासासाठी रक्ताचे पाणी करणारे असल्याचा विश्वास पवारांनी दिला.

हेही वाचा…मोदींच्या इंजिनला विकासाचे डबे – देवेंद्र फडणवीस

जयंत पाटील म्हणाले की, भाजपचे नेते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलण्याची भाषा करतायेत. गॅरंटीने सांगतो महाराष्ट्रातून ३२ ते ३५ खासदार आमचे असतील. आणि माण, खटावच्या जनतेने खासदार द्यायचा निर्धार केलाय तसा येथील आमदारही आम्हाला द्यावा असे आवाहन पाटील यांनी केले.

हेही वाचा…काँग्रेसची जागा जाण्याच्या खेळीत जयंत पाटीलच खलनायक – माजी आमदार विलासराव जगताप

धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की, माणच्या आमदाराने पोलीस आणि तहसीलदारांना हाताशी धरून ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार आपण चालू देणार नाही. कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास एक फोन करा मी तासाभरात तिथे येतो. भाजपने आजवर शेतकरी, कष्टकरी, पोलीस, शासकीय कर्मचारी अशा सर्वांवर अन्याय केलाय, तो आपल्याला थांबवायचा असल्यानेच शरद पवारांनी मला उमेदवारी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar predicts ncp s madha satara candidates to win by one lakh votes psg