Sharad Pawar Visits Massajog Village in Beed : ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आज (२१ डिसेंबर) बीडमधील मस्साजोग या गावी जाऊन या गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवादही साधला. शरद पवार म्हणाले, “बीडचे खासदार बजरंग सोनावणे व खासदार निलेश लंके यांनी या हत्येचा, बीडमधील जनतेच्या सुरक्षेचा मुद्दा लोकसभेत मांडला आहे. आमदार संदीप क्षीरसागर व आमदार जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेत देशमुख कुटुंबाच्या न्यायाची मागणी केली आहे. आम्ही देखील देशमुख कुटुंबाबरोबर आहोत. बीडवासियांचं दुखणं जिथं मांडायला हवंय तिथं मांडलं. बीडच्या लोकप्रतिनिधिंनी एकच गोष्ट सतत सांगितली की याचा सूत्रधार शोधला पाहिजे. हल्लोखोऱांचे सुसंवाद कोणाकोणाशी झाले. फक्त टेलिफोन वर असेल किंवा इतर कशावर. या सगळ्यांची जी माहिती आहे ही काढली पाहिजे. त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तूस्थिती सगळ्यांच्या समोर येईल हा आग्रह बजरंग सोनवणे आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी देशाच्या संसदेत केला आणि नेमकं हेच काम विधानसभेमध्ये बीडचे आमदार संधीप क्षीरसागर त्यांनी मांडला. जितेंद्र आव्हाड त्यांनी सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला. त्यांनी हा कधी विचार केला नाही की ती कोणत्या समाजाचे आहेत. अन्याय होतोय, अन्याय झालाय अन त्या अन्याय झाल्याला जे कोणी जबाबदार असेल त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला”.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार म्हणाले, “मी तुम्हाला एवढंच सांगेन की एक दहशतीचं वातावरण आहे. कृपा करा आणि त्या दहशतीतून बाहेर पडा. याला आपण सगळे मिळून तोंड देऊ. एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नांची भूमिका घेतल्यानंतर कोणीही आपल्याला अडवू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये जे काही घडतंय ती गोष्ट आम्हा कोणालाच न शोभणारी आहे. याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे. जे दुःखी आहेत, त्यांच्या दुःखामध्ये ते एकटे नाहीत. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. इथली स्थिती दुरुस्त कशी होईल याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे”.

हे ही वाचा > “RSS ने बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाला विरोध केलेला”, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल; म्हणाले, “भाजपा लोकांचं लक्ष वळवण्यासाठी…”

देशमुखांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ : शरद पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, “दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबात लहान मुलं आहेत. त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं आहे की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. माझ्याकडे बारामतीला फार मोठी मुलींची शैक्षणिक सुविधा आहे. जवळपास नऊ ते दहा हजार मुली तिथे शिकतात. त्याच्यामध्ये आणखीन एक मुलगी असेल. उद्या मुलगा येत असेल, त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू. त्यांना धीर देऊ. कुटुंबाला धीर देऊ. त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबातील इतर जे घटक आहेत त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की, तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या मागे हा सगळा आम्हा लोकांचा प्रचंड संख्येने एक वर्ग आहे. त्यामुळे न भिता या सगळ्याला, जे गेलंय जे झालंय ते तर आपण परत आणू शकत नाही पण निदान धीर देऊ शकतो. आत्मविश्वास वाढवू शकतो. ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळ्यांनी करू एवढंच या ठिकाणी सांगतो. राज्य सरकार, केंद्र सरकार याचा खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हा विश्वास सर्वांना देतो”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar promised to take responsibility of antosh deshmukh children education massajog beed asc