सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या विषयावर भाजप, संघ परिवारासह मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ‘ मंदिर वहीं बनायेंगे ‘ म्हणणाऱ्यांनी राम मंदिराची जागा का बदलली, असा सवाल करीत पवार यांनी, जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्याऐवजी भलत्याच प्रश्नांकडे जनतेचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला. सोलापूर लोखसभा मतदारसंघातील मंगळवेढ्यात झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत पवार बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचीही उपस्थिती होती.
पवार यांनी राम मंदिर बांधल्याने जनतेचे मूलभूत प्रश्न संपणार आहेत का, असा सवाल उपस्थित करीत, अयोध्येत मंदिर-मशीद वादावर तकालीन केंद्र सरकारने समन्वयक म्हणून आपल्यावर जबाबदारी सोपविली होती, याची आठवण करून दिली. आम्ही म्हणू तेच खरे, ही भूमिका घेणा-या घेणा-या सत्ताधा-यांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा >>>सांगली : राममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त मिरजेत १० दिवस कार्यक्रम – पालकमंत्री खाडे
सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप व मोदी सरकारकडून भावनांच्या मुद्यावरील राजकारणावर टीकास्त्र सोडले. सामाजिक समता आणि सामाजिक सुधारणांचे क्रांतिकार्य बाराव्या शतकात केलेले महात्मा बसवेश्वरांचे वास्तव्य मंगळवेढ्यात होते. याच मंगळवेढ्यात बसवेश्वर स्मारक उभारण्याचा निर्णय यापूर्वीच्या आमच्या सरकारने घेतला होता. परंतु बसवेश्वर स्मारक उभारण्याऐवजी जाती व धर्माच्या नावावर राष्ट्र उभारण्यास निघालेल्या प्रवृत्ती देशाच्या एकता आणि अखंडतेला घातक आहेत. अशा प्रवृत्ती नष्ट केल्या पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले.