|| दयानंद लिपारे

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरला. मागच्या निवडणुकीत लक्ष्य केले होते त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांच्याशी पवार यांनी राजकीय मैत्रीची नाळ जोडली. पण, करवीरनगरीत येऊनही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात याविषयीचे कुतूहल जागते ठेवले. या निर्णयाची प्रतीक्षा इच्छुक आणि त्यावर पाणी फिरण्याचा प्रयत्न करणारे दोघेही अधांतरी ठेवण्याबरोबरच आपल्यापासून अंतर राहणार नाही याची तजवीज पवार यांनी करून ठेवली.

गेल्या आठवडय़ात शरद पवार यांचा कोल्हापुरात तीन दिवस मुक्काम होता. पवार कोल्हापुरात आले म्हटल्यावर राष्ट्रवादीच्या पलीकडे जाऊन काही गाठीभेटी होतातच. तशा त्या झाल्या. पण त्यातील दोन महत्त्वाच्या ठरल्या. त्यातील काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची भेट तशी नित्याप्रमाणे ठरलेली. पण नेमके ते पवार यांना भेटत असताना हीच सम गाठत खासदार राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेतली.

राष्ट्रवादीची घरची वजाबाकी

याच वेळी पवार यांना घरच्या नाराजीला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा, माजी खासदार निवेदिता माने या मात्र पवार आणि पक्षाला अंतरल्या. माने या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होत्या. किमान शेट्टी यांना सोबत घेऊ नये यासाठी त्या आग्रही होत्या. पण त्यांना बेदखल ठरवत पवार यांनी शेट्टींशी जवळीक साधली. माने गट पूर्वीइतका प्रभावी राहिला नाही. त्यातून त्यांनी माने गटाच्या नाराजीची वजाबाकी होणार हे लक्षात घेऊनच शेट्टींची बेरीज केल्याचे राष्ट्रवादीतून सांगितले जाते. आता शेट्टी यांच्या विरोधात पुत्र धैर्यशील माने यांना अन्य पक्षाची उमेदवारी मिळवण्याचा निवेदिता माने यांचा इरादा दिसत आहे. हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने हाती भगवा घ्यायचा का याचा विचार करावा लागेल. लोकसभेची दुसरी निवडणूक त्या सेनेकडून लढल्या होत्या. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर त्यांनी हातावर घडय़ाळ बांधले आणि त्याआधारे लोकसभेत दोनदा पोहोचल्या. पक्षापासून बाजूला गेलेल्या माने यांची घरवापसी करताना शिवसेनेत कोणते तरंग उमटणार हेही महत्त्वाचे आहे. माने यांनी भाजप वा सेनेत प्रवेश केला तरी त्यांना शेट्टी यांच्या विरोधात उमेदवारी दिली जाणार का हाही मुद्दा उरतोच.

इच्छुकांमध्ये वाढती अस्वस्थता

कोल्हापूर जिल्ह्य़ातील दोन्ही लोकसभा जागा पक्षाकडे असणार हे पवार यांनी स्पष्ट केले. त्यातून दोन गोष्टी घडल्या. कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे देण्याची मागणी करणारे आमदार सतेज पाटील यांचा अपेक्षाभंग केला. त्यामुळे सतेज पाटील यांचे विरोधक खासदार धनंजय महाडिक यांना काहीसा दिलासा मिळाला. काहीसा यासाठी की, पवार यांना पत्रकारांनी पुन:पुन्हा टोचूनही त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण असणार अशी विचारणा करूनही त्यांनी थेटपणे बोलण्याचे टाळले. अर्थात कोणत्याही जागेचा उमेदवार जाहीर केला नसल्याने कोल्हापूर त्याला अपवाद राहणेही अशक्य. खासदार महाडिक आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील गटबाजी आणि त्याचे निवडणूक निकालावर होणारे परिणाम याविषयी विचारणा केल्यावर ‘याबाबतची माध्यमातून माहिती मिळाली’ अशी मिश्कील शेरेबाजी करत ‘पक्षातील सारे जण एकसंध असल्याने उमेदवार विजयी होणार’ असे मोघम भाष्य केले. उमेदवारीबाबत त्यांनी उत्कंठा वाढीस ठेवली. नाराज होऊन कोणी वाकडय़ा वाटेने जाऊ  नये याची खबरदारी त्यांनी घेतल्याचे दिसून आले. गटबाजी आणि कुरघोडी करणाऱ्या दोन्ही स्थानिक नेत्यांना त्यांनी ‘साहेब आपल्या बाजूनेच’ असे मांडे खायला भाग पाडले. पवार यांनी नेमकेपणाने कोणतेही थेट भाष्य केले नसल्याने ते निघून गेल्यानंतरही कोल्हापूर मतदारसंघातील अस्वस्थता कायम राहिल्याचे स्थानिक नेतृत्वाची देहबोली सांगत राहिली.

विरोधक मित्र बनला

हातकणंगले मतदारसंघातील आजी-माजी खासदार एकाच वेळी पवारांशी गुफ्तगू करीत राहिल्याने राजकीय धुरिणांसह सामान्यांच्याही भुवया उंचावल्या तर नवल. त्याला कारणही तसेच होते. एकतर शेट्टी यांनी दिलेले कारण. शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संसदेला घेराव घालण्याचे आंदोलन हाती घेतले आहे. यासाठी ते भाजप विरोधकांना बरोबर घेत आहेत. याकरिता त्यांनी यापूर्वीच पवार यांची भेट घेतली होती, पण पुन्हा लगेचच भेट घेण्याचे तसे काही खास प्रयोजन नव्हते. तरीही पवार यांना ते भेटले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी खुद्द पवार यांनीच राष्ट्रवादीच्या कोटय़ातून हातकणंगलेची जागा शेट्टी यांच्या स्वाभिमानाला सोडण्याची तयारी दाखवली. भाजपपासून दूर गेल्याने एकाकी झुंज देणे सोपे नाही असा विचार करून शेट्टी यांनी राजकीय मैत्रीचा नवा आधार शोधला आहे. बेरजेच्या राजकारणाचे पुढचे पाऊल पवार यांनी टाकत जुन्या शत्रूला नवा मित्र बनवला.