राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे आक्रमकपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. त्यांच्या टीकेला अजित पवार गटाकडून उत्तर देण्यात येत असते. राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी नुकतेच म्हटले की, आव्हाड यांच्यामुळेच दोन पवारांमध्ये अंतर वाढले. तसेच शरद पवार गटात स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी आव्हाड बोलत आहेत, असा आरोप मुंडे यांनी केला होता. त्यावर आता खुद्द शरद पवार यांनीच उत्तर दिले आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल, अजित पवार यांचे बारामतीमधील आवाहन आणि इतर विषयांवर सविस्तर भूमिका व्यक्त केली.
अजित पवारांचे बारामतीकरांना पुन्हा भावनिक आवाहन; म्हणाले, “सख्ख्या भावाच्या घरी जन्मलो..”
तत्पूर्वी धनंजय मुंडे काय म्हणाले ते पाहू
“जितेंद्र आव्हाड यांनी पवार कुटुंबियांमध्ये अंतर निर्माण करण्याचे काम केले. आज आव्हाड भावनिक असल्याचे दाखवतात. याचे कारण म्हणजे अजित पवार वेगळे झाल्यानंतर शरद पवार गटात जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे नसाव्यात आणि एकटे आपणच नेते व्हावे, असा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. शरद पवार यांच्या संमतीने भाजपाबरोबर जाताना जितेंद्र आव्हाड यांनी ५३ आमदारांसह स्वाक्षरी केली होती की नाही? याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली होती.
शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर पलटवार
पत्रकार परिषदेत शरद पवार यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्या कितीतरी वर्ष आधीपासून जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहेत. युवक अध्यक्ष ते राज्याचा कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. संघटन पातळीवरही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावं, याचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची गरज नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय अपेक्षित
“विधानसभा अध्यक्षांचा निर्णय काय येईल, याची मला आणि आमच्या सहकाऱ्यांना कल्पना होतीच. विधानसभा अध्यक्ष पदाची प्रतिष्ठा ते ठेवतील, असं वाटतही नव्हतं. शिवसेनेच्या निर्णयाची पुनरावृत्ती विधानसभा अध्यक्षांनी केली. पक्ष आणि चिन्ह याबद्दल निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी घेतलेली भूमिका आमच्यासाठी अन्यायकारक तर आहेच. पण पदाचा दुरुपयोग कसा केला जातो, याचे उदाहरण देशासमोर उभे राहिले आहे. आता सर्वोच्च न्यायालयात जाणे हाच एकमेव पर्याय राहतो. निवडणूक जवळ आल्यामुळे लवकरात लवकर निर्णय न्यायालयाने घ्यावा, ही आमची विनंती असणार आहे. आजवर अनेक निर्णय झाले, पण पक्ष आणि चिन्हा दुसऱ्याला देण्याची घटना घडली नव्हती. संबंध देशाला माहितीये की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कुणी केली, पण तरीही पक्ष आणि चिन्हा दुसऱ्याला देणं, हा अन्याय आहे”, अशी भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली.
“भाजपाला जे ६० वर्षांत जमलं नाही, ते…”, रोहित पवार यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर
अजित पवारांकडूनच भावनिक साद
बारामतीमध्ये आम्ही लोकांना भावनिक साद घालण्याचा प्रश्नच येत नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. “आमच्याकडून भावनिक आवाहन करण्याचं काही कारण नाही. बारामती मतदारसंघातील लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखत आहेत. पण ज्यापद्धतीने विरोधकांकडून वारंवार भूमिका मांडली जात आहे, त्यातून ते काहीतरी वेगळं सुचवत आहेत आणि त्याची नोंद बारामतीचे मतदार घेत आहेत. त्याची ते योग्य ती दखल घेतील. मी एका बाजूला असून इतर पवार कुटुंबिय माझ्या विरोधात आहे, असे लोकांना सांगून अजित पवार स्वतःच लोकांना भावनिक साद घालत आहेत”, अशी टीका शरद पवार यांनी केली.