मध्यरात्री झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपाचे तीन सदस्य राज्यसभेवर निवडून गेले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून आला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निकालाबाबत भाष्य केले आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
“मला धक्का बसेल असा हा निकाल नाही. प्रत्येक उमेदवाराच्या मतांची संख्या बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या कोट्यामध्ये काही फरक पडलेला नाही. पण एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडले आहे आणि ते कुठून आले आहे.ते मला ठाऊक आहे. ते महाविकास आघाडीचे नाही,” असे शरद पवार म्हणाले.
“शिवसेना महाविकास आघाडीतील ‘ढ’ टीम असल्याचे पुन्हा सिद्ध”; राज्यसभा निवडणुकीवरुन मनसेचा टोला
“शिवसेनेने लढवलेल्या सहाव्या जागेसाठी मतांची संख्या कमी होती. तिथे आमचा फरत वाढत होता. पण धाडस करत प्रयत्न केला. यामध्ये अपक्षांची संख्या भाजपाकडे अधिक होती पण दोघांनाही पुरेशी नव्हती. त्यामुळे भाजपाला आम्हाला पाठिंबा देणारे जे इच्छुक होते त्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी भाजपाने जी कारवाई केली त्यामध्ये त्यांना यश आले. त्यामुळे हा फरक पडला आहे. आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झाले आहे. यामध्ये वेगळे काही नाही. मान्य केले पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आले आहे,” असेही शरद पवार म्हणाले.
“सरकार चालवण्यासाठी जे बहुमत आहे त्यामध्ये काही धक्का लागलेला नाही. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही. अपक्ष आमदारांमध्ये या गमती झालेल्या आहेत. ते अधिकचे मत शिवसेनेला जाणार नव्हते. ते आमच्या विरोधकांच्या कोट्यातील होते. त्यांनी मला सांगून राष्ट्रवादीला दिले. तिथे असे अनेक लोक आहेत ज्यांनी मी शब्द टाकला तर त्यांची नाही म्हणायची तयारी नसते. पण मी त्याच्यात पडलो नाही,” असे शरद पवार म्हणाले.
“आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय”; संभाजीराजेंच्या समर्थकांचा शिवसेनेला टोला!
भाजपाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून महाविकास आघाडीच्या तीन मतदारांची मते बाद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने रात्री उशीरा मतमोजणीस सुरुवात केली. याबाबतही शरद पवारांनी भाष्य केले आहे. “रात्री जी हरकत घेण्यात आली रडीचा डाव होता. राज्यसभेच्या निर्मितीच्या नियमानुसार मतदाराने पक्षाच्या नेतृत्वाला मत दाखवायचे असते. त्यामुळे जर कोणी नाना पटोले आणि जयंत पाटील यांना मत दाखवले तर यामध्ये बेकायदेशीर काही नाही. याबाबत निवडणुक आयोगाने निर्णय दिला. पण निकाल येण्यासाठी चार तास उशीर झाला,” असे शरद पवार म्हणाले.