राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये भाषण करत असताना मी जो लोकसभेसाठी उमेदवार देईल, त्यालाच मतदान करा, असे आवाहन केले होते. हे आवाहन करताना अजित पवार म्हणाले होते, “काही लोक शेवटची निवडणूक असल्याचे सांगून भावनिक करतील, पण त्याकडे लक्ष देऊ नका. मीच लोकसभेला उभा आहे, असे समजून मतदान करा.” अजित पवारांच्या या भूमिकेनंतर शरद पवार गटाकडून त्यावर जोरदार आक्षेप घेण्यात आला होता. अजित पवार शरद पवार यांच्या मरणाची वाट पाहत आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यावर आता खुद्द शरद पवार यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित केल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांसमोर विविध विषयांवर भूमिका व्यक्त केली. यावेळी पत्रकारांनी अजित पवारांच्या विधानाची आठवण करून देत प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले, “मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही, हे मी पूर्वीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे भावनिक बोलण्याचा प्रश्नच येत नाही. बारामतीचे लोक शहाणे आणि समजूतदार आहेत. वर्षानुवर्ष कुणी काम केले आणि त्यांची प्रतिष्ठा वाढविली, हे त्यांनी पाहिलेले आहे. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील.”

अजित पवारांची ‘शेवटची निवडणूक’वरून सारवासारव अन् जितेंद्र आव्हाडांकडून चोख प्रत्युत्तर; म्हणाले, “जाऊ द्या कधीतरी…”

चिन्ह घेतलं, पक्ष घेतला आता आम्ही…

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर आज शरद पवारांनी त्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, “निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक आहे. आमचे निवडणूक चिन्ह तर घेतलंच पण आमचा पक्ष काढूनच दुसऱ्याला दिला. हे असं यापूर्वी देशात कधी घडलं नव्हतं. माझी खात्री आहे, लोक या गोष्टीला समर्थन देणार नाहीत. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जात आहोत, आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.”

छत्रपती शिवाजी महाराजांना कुणी घडवलं? योगींच्या विधानाचा अजित पवार निषेध करणार का? रोहित पवारांचा सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंनीच घडवलं

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी येथे आज बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदास स्वामी यांनी घडविले असल्याचे म्हटले. या विधानाचा शरद पवार यांनी विरोध केला. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वामागे राजमाता जिजाऊ यांचा हात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्याचे कर्तुत्व राजमाता जिजाऊंचे आहे. हे कर्तुत्व दुसऱ्या व्यक्तीला देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण संबंध जगाला इतिहास माहीत आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

अजित पवार राज्यसभेलाही घरातलाच उमेदवार देणार

दरम्यान रोहित पवार यांनीही बारामती लोकसभेवरून अजित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “अजित पवार आता बदलले आहेत. त्यांच्या गटातील काही नेते मला भेटले आणि त्यांनी सध्याच्या राजकीय वातावरणाबाबत माहिती दिली. अजित पवार लोकसभेला घरातल्याच व्यक्तीला संधी देतील. तसेच राज्यसभेसाठीही घरातीलच उमेदवाराला संधी देणार आहेत, असे बोलले जात आहे. शेवटी अजित पवार त्या पक्षाचे मालक आहेत, त्यामुळे ते ठरवतील तसा निर्णय होईल.”

रोहित पवार पुढे म्हणाले की, मागच्या आठवड्यात अजित पवार यांनी बारामतीमध्ये जे विधान केले, ते पाहून दुःख झालं. बदललेले अजित पवार मला पाहायला मिळाले. यावरून असे दिसते की, सुप्रिया सुळेंच्या विरोधात ते घरातीलच उमेदवार देतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar reaction on ajit pawar baramati speech about last election kvg
Show comments