मागील चार-पाच दिवसांपासून मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी जालन्यात शांततेत सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला आहे. या हल्ल्यात काही महिलांसह अनेक आंदोलकांना पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. अनेकांची डोकी फुटली आहेत. या घडामोडीनंतर विरोधीपक्षाने सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. सरकारच्या आदेशानेच हा लाठीहल्ला करण्यात आला, असा आरोप विरोधी पक्षाने केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. आमच्या तिघांपैकी कुणी लाठीहल्ला करण्याचे आदेश दिले असतील, तर मी राजकारणातून बाजुला होईल आणि विरोधकांनी आरोप सिद्ध केले नाहीत, तर त्यांनी राजकारणातून बाजुला व्हावं, असं विधान अजित पवारांनी केलं. अजित पवारांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जळगावात पत्रकार परिषदेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा- “मराठा आंदोलकांवरील हल्ला फडणवीसांनीच घडवला”, माजी खासदाराचा खळबळजनक आरोप

लाठीहल्ला करण्याचे आदेश आम्ही दिले असतील तर राजकारणातून बाजुला होईन, या अजित पवारांच्या विधानाबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले, “मला एवढं माहीत आहे की, तिथे लाठीहल्ला झाला. त्यांच्यावर लाठीहल्ला कुणी केला? तर पोलीस दलाचे लोक लाठीहल्ला करतात. त्यामुळे लाठीहल्ला करण्याच्या सूचना कुणी दिल्या? तिथे काय झालं? लाठीहल्ल्याची गरज होती का? या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण सरकारने द्यावं. कारण प्रशासन त्यांच्या हातात आहे, आम्हा लोकांच्या हातात नाही.”

हेही वाचा- “मला तिघेही खूप तणावात दिसतात”, शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांबाबत पंकजा मुंडेंचं मोठं विधान

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

“आम्ही तिघांपैकी कुणी तसे आदेश दिले असतील तर राजकारणातून बाजूला होईन. पण तसं सिद्ध नाही झालं, तर त्यांनी (विरोधकांनी) राजकारणातून बाजूला व्हावं. आहे का हिंमत? काहीजण जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण खुशाल सांगतात की वरून आदेश आल्यानंतर हे घडलं. मी सांगतो, वरून आदेश आले असं सिद्ध करून दाखवलं तर आम्ही म्हणाल ते हरू. पण उगीच शंका, गैरसमज निर्माण करायचे, समाजात अस्वस्थता निर्माण करायची आणि त्यातून काही साध्य करता येतं का, असा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. तो महाराष्ट्राला परवडणारा नाही. महाराष्ट्र सुसंस्कृत आहे याची जाणीव सगळ्यांनी ठेवायला हवी”, अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar reaction on ajit pawar statement over leave politics maratha reservation protest lathicharge rmm
Show comments