दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस नेते यांना ‘दंडुका’ प्रकरणावरून सल्ला दिला आहे. त्यांनी अशी भाषा करू नये, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.
दिल्लीतील निकालाच्या कलात काँग्रेसला कोठेही स्थान मिळाले नाही. या निवडणुकीतही त्यांना अद्याप भोपळा फोडता आलेला नाही. काँग्रेससाठी हा दिल्लीतील दुसरा मोठा पराभव मानला जात आहे. या निकालाबद्दल पुण्यात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, राहुल गांधी म्हणाले होते की लोक आता मोदींना दंडा मारतील, काँग्रेसची अवस्थाही आता तशीच झाली आहे का? या प्रश्नावर पवार म्हणाले की, ”राहुल गांधी यांनी असं बोलायची गरज नव्हती. या प्रकारची भाषा कोणीही करू नये. दिल्लीमध्ये काँग्रेस फार प्रगती करेल असं चित्र नव्हतं. त्यांचं तसं स्थानही दिल्लीत सध्या नव्हतं.”
भाजपाला टोला
”मोदी आणि अमित शाह यांच्या अहंकाराला लोक कंटाळले आहेत. त्यामुळे दिल्लीत लागलेल्या निकालाचं आश्चर्य वाटलं नाही. झारखंडमध्येही असाच कौल मिळाला, मध्यप्रदेश, छत्तीसगढलाही हेच झालं. भाजपाच्या पराभवाची सुरु झालेली मालिका कुठे थांबेल असं वाटत नाही. लोकांना स्थिर आणि विकासाला चालना देणारं सरकार हवं आहे. त्या दृष्टीने प्रयत्न होणं आवश्यक आहे,” असंही शरद पवार म्हणाले.
‘गोली मारो’ला जनतेनं दिलं उत्तर
धार्मिक भावना चेतवून दोन समाजांमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. यामुळे दिल्लीत धार्मिक कटुता कशी निर्माण होईल याचीही काळजी घेतली गेली. ‘गोळी मारा’ सारख्या घोषणा झाल्या. त्या सगळ्याला जनतेने योग्य ते उत्तर दिलं आहे, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.