लोकसभा अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरू असून त्यानुसार आज महाराष्ट्रातील अनेक खासदारांनीही शपथ घेतली. मात्र, यावेळी निलेश लंकेच्या शपथीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं. निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर आता त्यांचं कौतुक होऊ लागलं आहे. निलेश लंके यांची इंग्रजीतून घेतलेली शपथ म्हणजे त्यांनी सुजय विखे यांच्या टीकेला दिलेलं प्रत्युत्तर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Parliament Session : मराठी नव्हे इंग्रजीत… निलेश लंकेंचा संसदेत पहिला शपथविधी, शेवटी म्हणाले…

महत्त्वाचे म्हणजे निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी सुजय विखे पाटील यांना टोलादेखील लगावला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

“निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतली ही चांगली गोष्ट आहे. संसेदत मराठीच काय कोणत्याही भाषेत बोलता येते. तिथे प्रत्येक भाषेचे भाषांतर केलं जातं. त्यामुळे एखादी जनमाणसांत काम करणारी व्यक्ती देशाच्या संसदेत जात असेल तर तिच्या भाषेवरून प्रश्न उपस्थित करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. निलेश लंकेंनी त्यांना व्यवस्थित उत्तर दिलं आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

हेही वाचा – “विखे कुटुंबियांचा मला अभिमान”, निलेश लंकेंचं विधान चर्चेत; म्हणाले, “राधाकृष्ण विखेंचा आशीर्वाद…”

सुजय विखेंनी केली होती निलेश लंकेंवर टीका

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, माजी खासदार सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर शिक्षणावरून टीका केली होती. “निलेश लंके यांनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवल्यास मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेईन”, असं विखे पाटील म्हणाले होते. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारकाळात निलेश लंके यांनी सुजय विखेंच्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच काही प्रचारफेऱ्यांमध्ये आणि सभांमध्ये इंग्रजी वाक्ये बोलून दाखवली होती. दरम्यान, खासदारकीची शपथ इंग्रजीतून घेत लंके यांनी पुन्हा एकदा विखेंवर कुरघोडी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar reaction on nilesh lanke oath as lok sabha mp in english spb