केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला असून निवडणूक आयोगाचा निकाल अनपेक्षित असल्याचं म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा- उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? मशाल चिन्हही काढून घेतलं जाणार? समता पार्टी आक्रमक
सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्हाच्या वादात आपण पडणार नाही, अशी थेट प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्हाबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले, “सध्या धनुष्यबाणाचा जो वाद सुरू आहे. त्यात मी पडणार नाही, हे मी एकदाच सांगतो.” शरद पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.