Sharad Pawar on Raj-Uddhav Thackeray Reunion: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यातील दोन प्रमुख नेते एकत्र येण्याची चर्चा चार दिवसांपूर्वी सुरू झाली. अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी याबाबत सूचक विधान करत उद्धव ठाकरेंना साद घातली होती. त्यानंतर काही तासांतच उद्धव ठाकरे यांनी एका जाहीर भाषणात राज ठाकरेंच्या विधानाचा उल्लेख करत त्याला प्रतिसाद दिला होता. यामुळे चार दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवार यांनी कृषी क्षेत्रातील एआयच्या वापराबाबत त्यांची भूमिका मांडली. कृषीचे प्रश्न आपल्यासमोर प्राधान्याने असल्याचे ते म्हणाले. यावेळी पत्रकारांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेबद्दल त्यांचे मत काय? असा प्रश्न विचारला.
या प्रश्नावर उत्तर देत असताना शरद पवार म्हणाले, “हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. याबाबतची माहिती मला नाही. मी त्यांच्याशी अद्याप बोललो नाही. त्यामुळे यावर भाष्य करता येणार नाही.”
दरम्यान मागच्या १५ दिवसांपासून पवार कुटुंबियांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. पवार कुटुंबाचे मनोमिलन झाले आहे का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर शरद पवार म्हणाले की, जनतेच्या कामासाठी एकत्र यावे लागते. आताच मी ऊसाच्या उत्पादन वाढीसंदर्भात बोललो. या प्रश्नावर आम्ही वर्षानुवर्ष काम करत आहोत. पण नुसते काम करून चालत नाही. शेवटी सरकारलाही या कामात समाविष्ट करून घ्यावे लागते. यासाठी सरकारमधील प्रतिनिधींशी संवाद साधावा लागतो. यात काहीही चुकीची बाब नाही.
दरम्यान ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना पवार कुटुंबाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत नुकतीच भूमिका मांडली. माध्यमांनी याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, “पवार कुटुंब कालही वेगळे नव्हते, आजही नाही आणि उद्याही होणार नाही. आमचे राजकीय मतभेद नक्की झाले असतील पण ते आम्ही आमच्या नात्यात किंवा घरात येऊ दिलेले नाहीत. यावरुन आमच्यावर टीका झाली आहे. ही टीका आम्हाला मान्य आहे. अनेक कार्यक्रमांत आम्ही अनेकदा एकत्र आलो की आमच्यावर टीका होते. एन. डी. पाटील हे देखील आमच्या घरातलेच होते. त्यांनीही अनेकदा शरद पवारांवर टोकाची टीका केली. पण त्यामुळे माझी आत्या आणि त्यांची मुले यांच्यात कधी कटुता आलेली नाही.”