Sharad Pawar Reaction on Saif Ali Khan Attack : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेत्रा सैफ अली खानवर मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. घरात चोरी करण्याच्या उद्देशाने शिरलेल्या व्यक्तीने त्याच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला तत्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती आता स्थिर असून तो सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. दरम्यान, या हल्ल्यानंतर बॉलिवूडसह राजकीय नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली असून या प्रकरणात राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते
गुरुवारी रात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला, त्याने त्याच्या मोलकरणीबरोबर वाद घातला. जेव्हा सैफने हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला केला. या घटनेत तो जखमी झाला आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
शरद पवार काय म्हणाले?
“कायदा सुव्यवस्था किती ढासाळतेय हे लक्षात येतंय. याच भागात एकाची हत्या झालीय, हा हत्येचा दुसरा प्रयत्न आहे. या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहे. राज्य सराकरने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी जे गृहमंत्री आहेत, त्यांनी याकडे गांभीर्याने पाहावं”, अशी विनंती शरद पवारांनी केली.
उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी काय सांगितलं?
डॉ. नीरज उत्तमणी म्हणाले, “सैफला सहा जखमा झाल्या आहेत, त्यापैकी दोन जखमा खोल आहेत. एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे. आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत” असं लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ निरज उत्तमणी म्हणाले होते. अडीच तासांनी ही शस्त्रक्रिया पार पडली न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतरच सैफच्या प्रकृतीबद्दल जास्त माहिती देता येईल, असंही डॉ. उत्तमणी यांनी सांगितलं.