Sharad Pawar on Uddhav Thackeray Shivsena Party BMC Election : लोकसभा व महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता राजकीय पक्षांना मुंबई महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याआधीच ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिका शिवसेनेकडून (ठाकरे) हिरावून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने (शिंदे) जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांच्याबरोबर मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) देखील आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याच्या विचारात आहेत. गुरुवारी (२३ जानेवारी) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या अंधेरी येथील क्रीडा संकुलात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत स्वबळाचे संकेत दिले. यावर आता शिवसेनेचा (ठाकरे) महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्यांबद्दल शरद पवार म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करण्याच्या अधिकार दोन्ही पक्षांना आहे. परंतु, दोन्ही पक्षांचे मेळावे पाहिले तर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला अधिक लोकांची उपस्थिती होती”. यावेळी पवार यांना उद्धव ठाकरे यांच्या स्वबळाच्या घोषणेबाबत विचारले असता ते म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे माझ्याकडे आले होते. आमच्यात या विषयासह इतर काही विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी काल त्यावर भाष्य केलं. ते त्यांचं मत आहे. मात्र, त्यासाठी ते एकदम टोकाची भूमिका घेतील असं मला वाटत नाही”.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

आगमी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की “येत्या काही काळात महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतो आहे. मुंबई, संभाजीनगर नाशिक या सर्व महापालिकांमधील आपल्या पदाधिकाऱ्यांशी, तिथल्या आपल्या नेत्यांशी बोलून झालं. सगळ्यांचं म्हणणं आहे की एकटं लढा”.

उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना संदेश

उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, “आपली ताकद आहे? अमित शाहांना जागा दाखवणार आहात? ठीक आहे… अजून निवडणूक जाहीर झाली नाही. तुमची जिद्द, तयारी बघू द्या… ज्या भ्रमात आपण राहिलो, त्या भ्रमातून पहिलं बाहेर या….ज्या क्षणी माझी खात्री पटेल की आपली तयारी झाली आहे, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar reaction on shivsena uddhav thackeray party to contest bmc and local body election independently asc