ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणामुळे ठाण्यासह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांवर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभलाय” असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी “मै फडतूस नही, काडतूस हू… झुकेगा नही, घुसेगा साला” असं प्रत्युत्तर दिलं. यानंतर “फडतूस आणि काडतूस” शब्दाचा वाद वाढतच गेला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘फडतूस आणि काडतूस’ वरील वादावरून उद्धव ठाकरेंसह देवेंद्र फडणवीसांचे कान टोचले आहेत.

हेही वाचा- “काहींना माईक हातात आल्यावर…”, ‘त्या’ विधानांवरून अजित पवारांचा उद्धव ठाकरेंसह फडणवीसांवर निशाणा

‘फडतूस-काडतूस’ टीकेबद्दल विचारलं असता शरद पवार म्हणाले, “मला जो महाराष्ट्र माहीत आहे. मला जी महाराष्ट्रातील संस्कृती माहीत आहे. मला महाराष्ट्रातील जनतेची मानसिकता माहीत आहे. त्यामुळे अशा गोष्टी शक्यतो टाळायला हव्यात. वैयक्तिक टीका करू नये. तुम्ही राजकीय किंवा लोकांच्या प्रश्नांवरून आक्रमक राहा. पण वैयक्तिक टीका टिप्पणी किंवा चिखलफेक करून नका. अशी स्थिती निर्माण होणार नाही, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवं. राजकारणात मतभेद असतात, मतभिन्नता असते. पण टोकाची भूमिका घेणं आपण टाळलं पाहिजे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar reaction on uddhav thackeray devendra fadnavis kadtus fadtus dispute rmm
Show comments