Sharad Pawar On Uddhav Thackeray and Devendra Fadnavis : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या अंधेरी येथील क्रीडा संकुलात गुरुवारी (२३ जानेवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मात्र यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे विरोधक आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली नाही. अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची भेट देखील घेतली होती. फडणवीसांनी देखील अलीकडच्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली पाहायला मिळाली नाही. यावरून फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यातील नव्या मैत्रीचे संकेत दिसत आहेत का असा प्रश्न काही लोकांना पडला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांचे सहकारी शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी वेगवेगळे प्रश्न विचारले. शिवसेना उबाठा पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वक्तव्य केलं नाही. त्यावरून उद्धव ठाकरे यांचं शिवसेनेच्या (ठाकरे) मेळाव्यातील भाषण नव्या मैत्रीचे संकेत आहेत का? असा प्रश्न वार्ताहरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर उपस्थित केला. यावर शरद पवार म्हणाले, “मला नाही वाटत की यात काही संकेत असतील. उद्धव ठाकरे हे सातत्याने शाह व फडणवीस यांच्याबद्दल बोलत आहेत. ते नेहमीच बोलतात. महाराष्ट्राच्या जनतेने सातत्याने याची नोंद घेतली आहे. विरोधी पक्षांमधील नेतृत्वाने देखील याची नोंद घेतली आहे. दुसऱ्या बाजूला अमित शाह यांच्या बोलण्याचा स्वर अगदी टोकाचा राहिला आहे. त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. देशाचे गृहमंत्री काहीतरी तारतम्य ठेवून भाष्य करतील अशी अपेक्षा असते. मात्र अमित शाह तसा प्रयत्न करताना दिसत नाहीत. ते कोल्हापुरात अनेक वर्षे राहिले आहेत. मात्र त्यांच्यावर कोल्हापूरचे संस्कार आहेत असं वाटत नाही. ते खरंच कोल्हापुरात शिकले की आणखी कुठे शिकलेत त्याबद्दल काही सांगता येत नाही.
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत स्वबळाचे संकेत दिले. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे माझ्याकडे आले होते. आमच्यात या विषयासह इतर काही विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी काल त्यावर भाष्य केलं. ते त्यांचं मत आहे. मात्र, त्यासाठी ते एकदम टोकाची भूमिका घेतील असं मला वाटत नाही”.