कृषीविषयक संशोधन अडथळे आणल्याची जाहीर टीका केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी करत यासंदर्भात राज्य सरकारला जाहीररीत्या फटकारले. भाषणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा दोनदा उल्लेख करून संशोधनास अडथळे आणण्याची भूमिका बदलण्याचा त्यांनी सल्ला दिला.
येथील ‘महिको’ या बियाणे उत्पादक कंपनीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांचे उद्घाटन करताना ते बोलत होते. पवार यांच्या टीकेमागे अप्रत्यक्षरित्या राज्य सरकारने सुमारे दोन वर्षांपूर्वी ‘महिको’च्या कांही बियाण्यांना राज्यात विक्रीसाठी बंदी घातल्याच्या आदेशाचा संदर्भ होता. मागील वर्षी राज्यातील आघाडी सरकारला तीन वर्षे झाल्याच्या निमित्ताने बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. ‘महिको’सारख्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले असून यामुळे सर्वच बियाणे कंपन्यांना जरब बसली असल्याचे सांगून कोणत्याही कंपनीला नवीन वाण बाजारात विक्रीसाठी आणावयाचे असेल तर त्या वाणावर दोन वर्षे कृषी विद्यापीठात संशोधन करण्यात येईल, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले होते. आजच्या निमंत्रण पत्रिकेवर अध्यक्ष म्हणून राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा उल्लेख असला तरी ते अनुपस्थित होते. तर निमंत्रण पत्रिकेवर नाव नसलेले राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
पवार यांनी ‘महिको’ वरील कारवाईचा अप्रत्यक्षरीत्या हा संदर्भ देऊन सांगितले की, राज्यकर्त्यांची जबाबदारी हीतकारक संशोधनाच्या पाठीशी उभे राहण्याची असते. समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याऐवजी त्यांच्या पायात-पाय अडकविणे नुकसानकारक असते. मुख्यमंत्री आणि इतरांना विनंती आहे की, संशोधन करणारांना अडथळा आणण्याचे काम करीत असाल तर त्यामध्ये दुरुस्ती करावी. मुख्यमंत्र्यांना संशोधन क्षेत्राची जाण आहे, कारण ते केंद्रात विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री राहिलेले आहेत. कृषी संशोधनाच्या संदर्भात जे काही सध्याचे वातावरण आहे, त्यात त्यांना बदल करावा लागेल.
पवार म्हणाले, कृषी संशोधनाच्या संदर्भातील निर्णयाबाबत आपणास मंत्रिमंडळ पातळीवर आणि बाहेरही लढाई करावी लागते. नवीन संशोधित बियाण्यांच्या चाचणीवर दहा वर्षे बंदी घालण्याची मागणीही केली जाते. नवीन संशोधन थांबविण्याची मागणी ५० संशोधकांनी पंतप्रधानांकडे केल्याचे अलीकडे वाचनात आले. एखाद्या संशोधनातील निष्कर्ष समाजाच्या हिताचे नसतील तर ते आपण टाकून देऊ! परंतु कृषी संबंधित संशोधन करू नका, असे म्हणणारांविरुद्ध आपणास जनमत तयार करावे लागेल. अन्नधान्य उत्पादनात देशाची प्रगती झाली. परंतु २२ हजार कोटींच्या डाळी ६० हजार कोटींचे खाद्यतेल आपण आयात केले आहे. त्यामुळे स्वयंपूर्ण होण्यासाठी नवीन वाणांचे संशोधन करावेच लागेल! सर्वोच्च न्यायालयाबद्दल आपणास आदर असून त्यांच्या निर्णयावर भाष्य करावयाचे नाही. परंतु कोणी गाडीवर लाल दिवा लावावा किंवा कोणती पिके घ्यावीत, हेही आता सांगितले जात आहे. निकालाच्या प्रतीक्षेत हजारो खटले पडलेले असताना मी शेतात काय पेरावे किंवा पेरू नये, हे सांगितले जात आहे.
१९७२ नंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक अन्नधान्याचे उत्पादन वाढीसाठी संकरित वाणांच्या पिकांचा प्रसार करण्यासाठी मिशन म्हणून काम केले होते. शासकीय संस्था व खासगी कंपन्यांचे संशोधन आणि काळ्या मातीची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे विविध अन्नधान्ये आणि कापसाच्या निर्यातीतून देशास ३ लाख ३२ हजार कोटींचे परकीय चलन मिळाले आहे.
दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीला मिळालेल्या विजयाचा अप्रत्यक्ष उल्लेख करून ते म्हणाले की, या मंडळींनी निवडणूक प्रचारात आश्वासन दिल्याप्रमाणे भाजीपाला आणि कांद्याचे सध्याचे भाव ५० टक्क्य़ांनी कसे कमी होतील? आम्ही आमचा इतर खर्च कसाही वाढवू, परंतु शेतकऱ्यांचा माल स्वस्तात मिळावा, अशी भूमिका ही मंडळी घेत आहेत. दिल्लीत शेती नसल्याने पिके घेता येत नाही. परंतु अफवांचे पीक मात्र घेतले जाते.
एकदा या मंडळींच्या हाती सत्ता द्या आणि शेतीतील उत्पादन खर्च वाढला तरी तो कमी करण्याचे तंत्रही त्यांच्याकडून जगास कळू द्या! इतरांप्रमाणे उत्पादनाचा भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना का नसावा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जिल्ह्य़ाचे पालकमंत्री राजेश टोपे, प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. बद्रीनाथ यांची भाषणे यावेळी झाली. ‘महिको’ अध्यक्ष डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे भाषण कंपनीचे कार्यकारी संचालक राजेंद्र बारवाले यांनी वाचून दाखविले. बी. टी. कापसाबद्दल शेतकऱ्यांच्या सव्‍‌र्हेक्षणाचे निष्कर्ष नमूद करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. त्या अनुषंगांने डॉ. सी. डी. मायी यांनी मनोगत व्यक्त केले. ‘महिको’चे बियाणे उत्पादक शेतकरी भाऊसाहेब गरड, कुंडलिक काकडे, देवानंद मोटे, अजय देशमुख, आत्माराम सहाने यांचा यावेळी पवार यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. उषा झेर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Story img Loader