Sharad Pawar Maharashtra Assembly Elections Date : महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड व जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणूक एकत्र घेतल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच निवडणूक आयोगाने वेगळा निर्णय घेतला. आयोगाने आधी हरियाणा व जम्मू काश्मीरची निवडणूक घेतली आणि आता ते महाराष्ट्र व झारखंडची निवडणूक घेणार आहेत. पुढच्या आठवड्यात जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग आपला मोर्चा महाराष्ट्र व झारखंडकडे वळवणार आहेत. “महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपत असून त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल”, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केलं.

राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि सुखविंदरसिंग संधू यांनी दोन दिवसात राजकीय पक्ष, मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवडणूक अधिकारी यांच्या बैठका घेऊन विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला. येत्या काही दिवसांत निवडणूक आयोग राज्याच्या निवडणुका जाहीर करेल.

शरद पवार काय म्हणाले?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पवार म्हणाले, “माझा स्वतःचा असा अंदाज आहे की साधारणतः ६ ते १० ऑक्टोबरदरम्यान निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल. त्यानंतर काही दिवसांनी आचारसंहिता लागू केली जाईल. आचारसंहितेची तारीखही त्याच दिवशी जाहीर केली जाईल. निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर साधारण आठवडाभराने उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यानंतर १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडेल, अशी शक्यता आहे”.

मतदान किती टप्प्यात होणार?

मतदान दिवाळी, देवदिवाळी, छटपूजा काळात आणि आठवड्याच्या शेवटी न घेता मंगळवार, बुधवार, गुरुवारी घ्यावे, अशी मागणी राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ही मागणी योग्यच असून त्यावर विचार होईल. असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. निवडणूक एकाच टप्प्यात घेण्याची मागणी काही राजकीय पक्षांनी केली असल्याच्या वृत्ताला आयोगाने दुजोरा दिला, मात्र त्यावर कोणतेही मत व्यक्त केले नाही.