कर्जतमध्ये अजित पवार गटाचं वैचारिक मंथन शिबिर पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं. पण, शरद पवारांकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. आता, शरद पवार यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलं आहे. “काहींनी टीका-टिप्पणी केली. पण, खूप विचार करण्याची गरज नाही,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवारांनी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शशिकांत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार अरूण लाड आणि आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते.
“…तेच महाराष्ट्रात पाहायला मिळेल”
शरद पवार म्हणाले, “कुणी पक्ष सोडून गेलं असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. शेवटी जनतेत जे भूमिका मांडून पाठिंबा घेण्यासाठी यशस्वी होतात, जनताही त्यांच्याबरोबर राहते. तेच महाराष्ट्रात पाहायला मिळेल.”
हेही वाचा : “मला अजित पवार अन् प्रफुल्ल पटेलांनी मंत्रीपदाची ऑफर दिली होती, पण…”, अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण
“…तर राष्ट्रवादी काँग्रेसची एक फळी मोठ्या मतांनी निवडून येईल”
“महाराष्ट्रात नवीन लोकांना संधी देण्याची वेळ आली आहे. ही युवकांची संघटना मजबूत करू शकलो, तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एक फळी मोठ्या मतांनी निवडून येईल,” असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
“लक्ष विचलित करण्यासाठी टीका केली जाते”
“काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले, टीका-टिप्पणी केली. बाहेर पडलेल्यांनी पक्ष नेण्याचा प्रयत्न केला. पण, खूप विचार करण्याची गरज नाही. जनता प्रश्न विचारेल म्हणून लक्ष विचलित करण्यासाठी टीका केली जाते. सत्ता येते, जाते. मात्र, जनता तुम्ही कुठून निवडून आला, तुमचं पक्षचिन्ह, तुमचा कार्यक्रम याचा विचार करते. त्यामुळे जागरूक जनता महाराष्ट्रात आहे, तोपर्यंत परिवर्तन करण्याची धमक समाजात आहे. आपल्याला परिवर्तनाचा कार्यक्रम घेऊन पुढं जायचं आहे,” असं शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
“मतदारसंघ निवडून आणण्यासाठी पुढील पावले टाकली पाहिजेत”
“तीन-चार महिन्यांवर लोकसभा निवडणूक आली आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक आहे. पक्षानं ठरवलेला मतदारसंघ निवडून आणण्यासाठी पुढील पावले टाकली पाहिजेत,” असं निर्देश शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
अजित पवार काय म्हणाले होते?
“शपथविधीपूर्वी आम्ही शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वेळोवेळी पूर्वकल्पना दिली होती. मात्र, त्यांनीच आम्हाला सातत्याने गाफील ठेवले,” असा आरोप अजित पवार यांनी केला होता.
“राजीनामा द्यायचा नव्हता, तर…”
“२ मे ला शरद पवार यांच्या पुस्तक प्रकाशनाचा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात कार्यक्रम झाला. तेव्हा शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. याची पूर्वकल्पना कोणालाच नव्हती. पवारांनी राजीनामा दिल्यावर सुप्रिया सुळे यांची अध्यक्षपदाची निवड करायची, असे ठरले होते. राजीनामा दिल्यावर पवार घरी गेले. जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना राजीनामा मागे घ्यावा म्हणून चव्हाण प्रतिष्ठानसमोर आंदोलन करण्याची सूचना केली. त्यानुसार काही ठराविक टाळकी तेथे ठाण मांडून बसली होती. जर राजीनामा द्यायचा नव्हता तर दिला तरी कशाला,” असा सवाल अजित पवार यांनी केला.
“१७ जुलैला आम्हाला का बोलावले?”
“पक्षाच्या खासदार व आमदारांनी २ जुलैला घेतलेला निर्णय आवडला नव्हता तर मग १७ जुलैला आम्हाला का बोलावले? पहिले मंत्र्यांना बोलवले, नंतर आमदारांना बोलवले नंतर सगळं सुरळीत होणार आहे असे सांगत होते. त्यावेळीही गाफील ठेवले गेले. १२ ऑगस्टला उद्याोगपतींच्या घरी बैठकीसाठी बोलावले. निर्णय घ्यायचा नव्हता तर गाफील का ठेवले,” असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केला होता.