शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याकांडांत ११३ लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा शरद पवारांनी राजीनामा दिला नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गोवारी प्रकरणात तत्कालीन आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. आताच्या गृहमंत्र्यांनी पिचडांचं स्मरण करावे, असं म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याकांडात ११३ लोकांचा मृत्यू झाला. तेव्हा शरद पवार पाहायलाही गेले नाहीत आणि राजीनामाही दिला नाही. आता त्यांचे काही लोक आमच्याबरोबर सत्तेत आले आहेत. त्यामुळे ते नाराज झालेत. चिडलेले आहेत,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं.

याला जालन्यात प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, “नागपुरात आदिवासींसाठी गोवारीचं आंदोलन झालं होतं. तेव्हा चेंगराचेंगरी झाली होती. त्यात काही जणांचा मृत्यू झाला. गोवारी आंदोलनावेळी मी नागपुरात नाहीतर मुंबईत होतो. हा प्रकार झाल्यावर तत्कालीन आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता.”

“‘नैतिक जबाबदारीतून मी राजीनामा देत आहे,’ असं मधुकर पिचड यांनी सांगितलं होतं. गृहखात्याची नैतिक जबाबदारी असणाऱ्यांनी मधुकर पिचड यांचं स्मरण करावे,” असं सांगत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे कान टोचले आहेत.

Story img Loader