कर्नाटकात १० मे रोजी मतदान होणार असून, निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातील नेते कर्नाटकात प्रचार करत आहेत. रविवारी ( ७ मे ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीतील एका प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. कर्नाटकात काय करणार, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
“निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. पण, हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय करणार? येथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मिलीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : “राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं का?”, सामनाच्या अग्रलेखावरून छगन भुजबळांचा संजय राऊतांना प्रश्न
याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हसत प्रत्युत्तर दिलं आहे. ते सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “मी निपाणीला चाललो आहे. त्यामुळे कोण पार्सल आहे, कोण किती वर्षाचं आहे, या सगळ्यावर तिकडं सविस्तर बोलेन,” अशा मोजक्या शब्दांत शरद पवारांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.
निवृत्तीबद्दल बोलताना शरद पवारांनी म्हटलं, “पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी आपण निवृत्ती मागे घेतली. पुढील वर्षातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत आपण अध्यक्षपदी राहणार आहोत. सुप्रिया सुळे यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपविण्याचा विचार आताच करता येणार नाही,” असेही शरद पवारांनी स्पष्ट केलं.