राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा यासाठी पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. आज वाय. बी. सेंटरवर यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष निवड समितीची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये शरद पवारच अध्यक्षपदी कायम राहतील, अशा प्रस्ताव मंजूर करून घेणार असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. मात्र, शरद पवार जर राजीनाम्यावर ठाम राहिले, तर पुढची गणितं कशी असतील? याची आता चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात अंतर्गत पदनियुक्तीचा फॉर्म्युला ठरल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

शरद पवारांचं सूचक विधान

शरद पवारांनी गुरुवारी वाय. बी. सेंटरबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ‘तुम्हाला दोन दिवसांनी आंदोलन करण्याची गरज पडणार नाही’, अशा आशयाचं विधान केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. शरद पवार राजीनामा मागे घेणार असल्याचे सूतोवाच या विधानातून मिळाल्याचे अंदाज बांधले जात आहेत. मात्र, दुसरीकडे पक्षांतर्गत कुणाला अध्यक्षपद मिळणार? याचेही आडाखे बांधले जात आहेत.

“राष्ट्रवादीतला एक गट भाजपाच्या उंबरठ्यापर्यंत”, पवारांच्या राजीनाम्याबाबत ठाकरे गटाचा मोठा दावा; म्हणे, “राज्यात कधीही भूकंप..!”

फॉर्म्युला ठरला?

दरम्यान, शरद पवारांनी राजीनामा दिल्यापासून पक्षांतर्गत रचनेच्या फॉर्म्युल्याची चर्चा होऊ लागली आहे. कार्यकर्त्यांनी राजीनाम्याला विरोध केल्यानंतर शरद पवारांनाच अध्यक्षपदी कायम राहण्यासाठी राजी केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, त्याचवेळी भावी अध्यक्षाला तयार करण्याचीही प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचीही चर्चा आहे. त्याच आधारावर सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, सुप्रिया सुळेंकडे केंद्रीय नियोजनाची जबाबदारी तर अजित पवारांकडे राज्यातली राजकीय समीकरणांचे अधिकार सोपलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Live Updates