महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडव्या निमित शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर आज शरद पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकारपरिषदेत बोलताना प्रत्युत्तर दिलं.
शरद पवार म्हणाले, “ एक गोष्ट चांगली झाली, हे कुठे भूमिगत झाले होते, याचा काही कोणाला अंदाज येत नव्हता. त्यामुळे ठाकरे महाराष्ट्रात सार्वजनिक यायला उत्सुक आहे हे कालच्या सभेतून दिसलं. त्यांचं हेच वैशिष्ट आहे की, दोन-चार महिने कुठेही भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन-चार महिने काय करतात मला माहीत नाही. ते जातीयवादाबाबत जे बोलले त्याबद्दल सांगायचं झालं तर, ते काही म्हणू शकतात त्यांच्या तोंडावर कुणी मर्यादा आणू शकत नाही. ”
तसेच, “ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांनी मागील पाच -सात वर्षांचा त्यांनी उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व राज्यात कोण कोण करत होतं? महाराष्ट्राची विधानपरिषदेत पहिल्यांदा छगन भुजबळ नेते होते. त्यानंतर मधुकरराव पिचड हे नेते होते. भुजबळ कोणत्या समाजाचे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. अशी सर्वांची जर यादी बघितली, तर यावेळी पहिल्यांदा अजित पवारांची निवड झाली आणि त्याचं कारण, सभासदांनी असं सांगितलं की त्यांना विधीमंडळात येऊन ३० वर्षे झाली आणि एवढा काळ एखादी व्यक्ती त्या ठिकाणी काम करत असताना, त्यांना संधी द्यावी. त्यातून ही निवड झाली. सर्व जाती-जमातीच्या लोकांना घेऊन पुढे जाणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे आणि यापुढेही राहील. ” असंही शरद पवार म्हणाले.
पण महाराष्ट्रात असं कधी उद्धव ठाकरेंचं सरकार होऊ देणार नाही –
याचबरोबर,“उत्तर प्रदेशचं कौतुक त्यांनी केलं, तर मघाशीच मी सांगितलं की ते काही बोलू शकतात. आता उत्तप्रदेशात कौतुकासारखं त्यांना काय दिसलं हे मला माहिती नाही. उत्तर प्रदेशात अलीकडच्या काळात काय काय घडलं? निवडणुकीचा निकाल वेगळा लागला त्याची कारणं दुसरी आहेत. पण त्या ठिकाणी लखीमपूरला शेतकऱ्यांची हत्या झाली, उत्तर प्रदेशच्या सीमेवर जवळपास वर्षभर शेतकरी बसले होते, त्या सगळ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करायला. कोणी पुढे आलं नाही. कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या उत्तर प्रदेशात घडलेल्या आहेत, योगींच्या राजवटीच्या काळात आणि अशा पद्धतीची राजवट उत्तम आहे असं जर राज ठाकरे म्हणत असतील, तर मला काही त्यावर भाष्य करायचं नाही. पण महाराष्ट्रात असं कधी उद्धव ठाकरेंचं सरकार होऊ देणार नाही.” अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंवर शरद पवारांनी निशाणा साधला.
“राज ठाकरेंनी मोदींबाबत काय काय भूमिका मांडलेली आहे, हे संबंध महाराष्ट्राने पाहीलं आहे. आता त्यांच्यात काहीतरी बदल झाल्याचं दिसतोय. नुकतच मी हे देखील वाचलं आहे की ते अयोध्याला जाताय, आणखी काय काय करत आहेत. तर असा त्यांच्या बदल होताना दिसतोय. त्यामुळे त्यांची मोदींबाबतची भूमिका सध्या, आज, उद्या काय असेल याबद्दल मी काही सांगू शकत नाही. कारण, त्यांच्या भूमिकेत सातत्य नसतं. हे अनेकदा आपण पाहिलेलं आहे.” असंही म्हणत शरद पवार यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
“जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार”, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. “१९९९ ला राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रातील जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं. आम्ही जातीपातून बाहेर पडत नाहीत, मग हिंदू कधी होणार,” असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी बोलताना केला होता.