वाई: महाराष्ट्रात आज जो मराठा आणि ओबीसी यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे, त्याचे मूळ २३ मार्च १९९४ च्या अध्यादेशामध्ये आहे. त्या वेळी मतांचे राजकारण करत शरद पवार यांनी जो चुकीचा निर्णय घेतला, त्याने आज ही जातींमधील तेढ वाढली आहे. आता हे थांबवायचे असेल तर जातनिहाय जनगणना करत त्यांच्या सद्यस्थितीनुसार प्रत्येकाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे मांडली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर कोरेगाव येथे आयोजित आभार मेळाव्यात उदयनराजे बोलत होते. सध्या राज्यात सर्वत्र पेटलेल्या मराठा आणि ओबीसी संघर्षांचा संदर्भ देत उदयनराजे यांनी याला राजकीय हेतूने इतिहासात घेतलेले निर्णय जबाबदार असल्याचा आरोप केला. यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दोषी ठरवत उदयनराजे म्हणाले, की आजच्या या वादाचे मूळ २३ मार्च १९९४ रोजी काढलेल्या अध्यादेशामध्ये आहे. त्या वेळी या जातींच्या राजकारणाचा फायदा घेण्यासाठी पवारांकडून चुकीचे निर्णय घेतले गेले. याचा फटका आज मराठा आणि ओबीसी या दोन्हीही वर्गातील गरिबांना बसत आहे. यानंतरही राजकारणी लोकांकडून राजकीय स्वार्थासाठी वेळोवेळी जातीजातींमध्ये भांडणे लावण्याचे काम करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांच्या कृत्यांमुळेच महाराष्ट्रातील जातीय स्थिती अशी स्फोटक झाली आहे. ज्येष्ठ म्हणवणाऱ्या नेत्यांकडून त्या वेळी योग्य निर्णय घेतले असते तर महाराष्ट्राची आजची सामाजिक स्थिती अशी झाली नसती. आता हे सर्व नेते सध्या सोयीस्कर शांत असून, सरकारवर जबाबदारी ढकलत आहेत. आता हे थांबवायचे असेल तर जातनिहाय जनगणना करत प्रत्येकाच्या सद्यस्थितीनुसार त्या त्या जातीला आरक्षण द्यावे, अशी भूमिका उदयनराजे यांनी या वेळी मांडली.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंशी झालेल्या भेटीनंतर निलेश लंकेंनी केला निर्धार; म्हणाले, “नगर जिल्ह्यात…”

यावेळी आमदार महेश शिंदे, भाजपच्या डॉ. प्रिया शिंदे, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, सुनील काटकर, राहुल बर्गे, सेवागिरी ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जयवंत पवार, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, राहुल पाटील यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : “छगन भुजबळ दंगल घडवणार”, मनोज जरांगेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, “ते सरकारमध्ये बसून…”

सातारा कुणामागे, हे स्पष्ट

दरम्यान, लोकसभा निवडणुकीने सातारा जिल्ह्याचे राजकारण स्पष्ट झाले आहे. हा जिल्हा कुणाला त्यांचा बालेकिल्ला वाटत होता. अनेक नेते तशा वल्गना करत होते. मात्र आता या निकालाने ते चित्र खोडून टाकले आहे. मी आजवर कधीही कायम राजकारण केले नाही. मात्र आता यापुढे मी आणि शिवेंद्रसिंहराजे यात लक्ष घालणार आहोत. बालेकिल्ला म्हणणाऱ्यांना, गटबाजीचे राजकारण करणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देणार आहोत.