राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याचं शरद पवारांनी यावेळी जाहीर करताच उपस्थित कार्यकर्ते आणि नेतेमंडळी भावनिक झाली. यावेळी सभागृहात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. शरद पवार जोपर्यंत निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही सभागृह सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. यावर बोलताना अजित पवारांनी पक्षाची कमिटी जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल, असं शरद पवारांनी सांगितल्याचं जाहीर केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवारांनी आज लोक माझे सांगाती पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी केलेल्या भाषणाच्या शेवटी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याची वेळ आली असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. त्यानंतर आता शरद पवारांनी हा निर्णय जाहीर केल्यामुळे हे विधान त्यांच्याच बाबतीत होतं का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवारांनी आपण अध्यक्षपदावरून निवृत्त होत असून खासदारकीची उरलेली ३ वर्षं राष्ट्रीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. “१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनीक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपुर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधिक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार अध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता?

दरम्यान, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि आग्रह केल्यानंतर शरद पवारांनी त्यावर नव्याने भूमिका मांडली आहे. “अध्यक्षपदाबाबत पक्षांतर्गत नेमण्यात आलेली समिती जो काही निर्णय घेईल, तो मला मान्य असेल”, असं शरद पवारांनी सांगितल्याचं अजित पवारांनी उपस्थितांना जाहीर केलं. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनीही निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती सगळ्यांच्या वतीने शरद पवारांना करत असल्याचं उपस्थितांना सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar retirement news steps down as ncp president pmw
Show comments