शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड असलेले नेते आहेत. महाराष्ट्राचं राजकारण हे त्यांना गेल्या पाच दशकांपासून ठाऊक आहे. आज (१७ जुलै) पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांचं बदलणारं स्वरुप या विषयावर सविस्तर भूमिका मांडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. तसंच आपली आवडती वृत्तपत्रं कुठली? हेदेखील पवारांनी सांगितलं.

काय म्हणाले शरद पवार?

“मी मध्यंतरी प्रवास करत होतो तेव्हा माझ्या शेजारी एक गृहस्थ बसले होते. मी त्यांना सहज विचारलं तर म्हणाले मी टाइम्समध्ये एडिटर आहे. त्यांना विचारलं अमुक एका व्यक्तीला ओळखता का? तर ते म्हणाले मी वेगळ्या विभागाचा एडिटर आहे आणि ते वेगळ्या. आता वृत्तपत्रांमध्ये विभागवार संपादक असतात. आधी असं नव्हतं. आत्ताच्या घडीला अनेक बदल झाले आहेत. पूर्वी बातम्यांपेक्षा अग्रलेख काय आहे? यावर चर्चा व्हायची. पां. वा. गाडगीळ होते त्यांचे अग्रलेखही वाचनीय असायचे. वृत्तपत्राकडे बघत असताना संपादक आणि त्यांचं लिखाण चर्चेत असायचं. गोविंदराव तळवलकरांनी काय लिहिलं? इतरांनी काय लिहिलं याची उत्सुकता असायची.”

हे पण वाचा- “शेवटी ते वारीला आलेच नाहीत”, शरद पवार-राहुल गांधींचा उल्लेख करत भाजपाचं टीकास्र!

मी लोकसत्ता आणि इंडियन एक्स्प्रेस आवर्जून वाचतो

लोकसत्ता आणि इंडियन एक्स्प्रेस ही माझी आवडती वृत्तपत्रं आहेत. महाराष्ट्रात असेन तेव्हा लोकसत्ता आवर्जून वाचतो, तसंच दिल्लीत असेन तेव्हा इंडियन एक्स्प्रेस नक्की वाचतो असं शरद पवार यांनी सांगितलं. तसंच त्यांनी टीव्ही मीडियाची मला काळजी वाटते असंही म्हटलं आहे. टीव्ही मीडियाबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले, “मला खरंच तुमची काळजी वाटते, दिल्लीत थंडीच्या मोसमात प्रचंड थंडी आणि उन्हाळ्यात खूप उन असतं. मी दिल्लीत असतो तेव्हा माझ्या घरासमोर ३० ते ४० कॅमेरे असतात. तासन् तास ते उभे राहतात. ओझं डोक्यावर घेऊन आमच्या मागे उभे असतात. यापेक्षाही दक्षिणेतलं चित्र वेगळं आहे. तिथल्या पत्रकारांची संख्या जास्त आहे, ते यातना सहन करुन बातमी मिळवण्याचं काम करतात” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar
शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

अजित पवारांच्या मुद्यावर एका वाक्यात उत्तर

पत्रकारांनी त्यांना विविध राजकीय प्रश्नांबाबत बोलते केले. यावेळी अजित पवार यांनी विकासकामे करूनही त्यांचा बारामतीत पराभव कसा काय झाला? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार एका वाक्यात म्हणाले, “अरे ती बारामती आहे.” असं म्हणत त्यांनी विषय संपवला. शरद पवार पुढे म्हणाले, “मतदारसंघातील लोकांशी तुमचा संवाद कसा आहे? त्यावर बऱ्याच गोष्टी ठरतात. मात्र आता तसा संवाद होत नाही. बारामतीत जर मला कुणी भेटायला आले तर मला त्यांच्या वडीलांचे नाव विचारावे लागते. तेव्हा कळते हा कुणाच्या घरातला आहे. दोन पिढीतील हा संवाद कायम ठेवला तर लोक कधीही नेत्याला विसरत नाहीत. त्यामुळे बारामतीत कुणी काहीही म्हटले तरी मला खात्री होती की, सुप्रिया सुळेंना अधिक मतदान होईल. घरातलाच विरोधी उमेदवार असतानाही सुप्रियाला ४० हजारांचे लीड दिलं.”

Story img Loader