Sharad Pawar : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक ही २६ नोव्हेंबरच्या आत होईल हे विधानसभा आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं. लोकसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शरद पवारांनी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरच्या आत पार पडेल असं शरद पवार यांनी सांगितलं. तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार तीन नेत्यांना असेल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले शरद पवार?

“आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्यासाठी समिती तयार केली आहे. ही समिती प्रत्येक तालुक्यांत जाऊन सर्व्हे करणार आहे. त्यानंतर जे लोक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्याबाबत लोकांचा कल जाणून घेणार आहेत. जो ओरिजनल इच्छुक आहे त्याला काही विचारलं जाणार नाही. सामान्य माणसांची मतं जाणून घेतली जाणार आहेत. तसंच दूध संस्था, सहकारी संस्था आणि इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची मतं ही समिती घेईल. त्यानंतर उमेदवार ठरवला जाणार आहे अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्याच्या समितीत कोण?

महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शिवसेना उबाठाचे संजय राऊत आणि काँग्रेसचे नाना पटोले या तिघांकडे असतील. या तिघांची समिती उमेदवारांबाबत माहिती घेईल, लोकांचा कल जाणून घेईल. त्यानंतर उमेदवार ठरवले जातील. येत्या ८ ते १० दिवसांत या गोष्टी आम्हाला संपवायच्या आहेत. जी समिती आम्ही नेमली आहे ती त्यांचं म्हणणं मांडेल त्यानंतर उमेदवाराचा निर्णय घेतला जाईल. प्रत्येकाला वाटतं हा मतदारसंघ आपलाच आहे. आघाडी म्हटल्यावर काही निर्णय घ्यावे लागतात. असं शरद पवार म्हणाले.

हे पण वाचा- Amruta Fadnavis : “मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे असे..”, अमृता फडणवीस यांची शरद पवारांवर टीका, उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाल्या?

६ ते १० ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूक तारीख जाहीर होईल

गेल्या दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आली. त्यांनी राजकीय पक्षांशी चर्चा केली. माझा अंदाज आहे की ६ ते १० ऑक्टोबर दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. त्या दिवसांपासून आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर अर्ज स्वीकारले जातील. साधारण १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला.

लोकसभेचं चित्र आठवून बघा

तुम्हाला लोकसभेचं चित्र आठवत असेल. त्यावेळी वेगळं वातावरण झालं होतं. ४०० च्यावर जागा येतील असं मोदी सांगत होते. अनेक राजकीय पक्षाचे नेते वेगळे आडाखे बांधत होते. पण महाराष्ट्रातील जनतेचा सूर वेगळा आहे हे जाणवत होतं. नेते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. पण सामान्य कार्यकर्ता जो काही निर्णय घेतो, त्याची बांधिलकी मतदारांशी असते. कार्यकर्त्यांचं मत वेगळं होतं हे मला माहीत होतं. आम्ही तीन पक्षांना एकत्र केलं. त्यावेळी माझ्या वाचनात आलं की, हे लोक (महाविकास आघाडी) एकत्र आले खरे पण हाताच्या बोटावर मोजण्या इतके यांचे लोक निवडून येणार नाहीत, असं म्हटलं जात होतं. पण तरुण पिढी आणि कार्यकर्ता यांची सामान्य जनतेशी नाळ तुटली नाही हे आम्हाला माहीत होतं. त्यामुळेच आपला विजय झाला, असं पवार म्हणाले.