राज्यात सध्या एकनाथ शिंदे-भाजपा यांचे संयुक्त सरकार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून सत्ताशकट हाकत आहेत. राज्यात शिंदे सरकारची स्थापना होऊन साधारण एक महिना उलटला असून अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. याच कारणामुळे हे सरकार लवकरच पडेल. लवकरच निवडणुका लागतील असा दावा विरोधकांकडून केला जातोय. असे असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार कधी पडेल याबाबत मला माहिती नाही. मी ज्योतिषी नाही. पण निवडणुका लागल्या तर आमची तयारी आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >> सत्ताबदलावर अजित पवार यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले “माझा मुहूर्तावर…”

“सरकार कधी पडेल याबाबत मला काही माहिती नाही. मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे मी यावर काही भाष्य करणार नाही. पुढे निवडणुका आल्या तर आम्ही तयार आहोत. निवडणुका येणार नसतील तर सध्या राज्य सरकार कोणत्या पद्धतीने चालवलं जातंय यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. जिथे कमतरता आणि चुका असतील त्या समजण्याची भूमिका आमची आहे,” असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा >> महाराष्ट्र अतिवृष्टी : उंटावरून शेळ्या राखणाऱ्यांना समस्या कशा समजणार? अजित पवारांचा राज्य सरकारला टोला

तसेच सध्या मुख्यमंत्री राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आपल्या दौऱ्यात वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. यावरदेखील शरद पवार यांनी भाष्य केले आहे. “मुख्यमंत्री दौऱ्यावर निघतात ही चांगली गोष्ट आहे. मात्र कोणत्या भागाला भेट द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी लोक संकटात आहेत. जेथे अतिवृष्टी झालेली आहे अशाच ठिकाणी विरोधी पक्षाने दौरा केला. स्वागत आणि सत्कारासाठी विरोधी पक्षाचे दौरे निघालेला दिसत नाहीत,” असा टोला शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांचे नाव न घेता लगावला.

Story img Loader