लोकसभा निवडणुकीत बारामती हा सर्वात हाय व्होल्टेज मतदारसंघ ठरला होता. याचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांचा लढा. नणंद आणि भावजयची ही लढाई खास करुन शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी होती. ही लढाई सुप्रिया सुळेंनी जिंकली आहे. बारामती कुणाची तर ती शरद पवारांचीच यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम लोकसभा निवडणुकीने केलं. शरद पवारांनी ही किमया साधून दाखवली. लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनला लागले आहेत. निकालाला १६ दिवस उलटूनही त्यानंतर होणारी चर्चा थांबलेली नाही. शरद पवारांनी सुप्रिया सुळेंचं उदाहरण देत त्यांना मोदींपेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्याचं म्हटलं आहे. तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

शरद पवार काय म्हणाले?

“मोदी सरकारवर आणि भाजपावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. मोदी सरकारमधले लोक म्हणतात की आम्ही खाणाऱ्यांचा विचार करतो. पण पिकवणाऱ्याने जर पिकवलं नाही तर खाणारा काय खाणार? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला. तसंच शेतकरी अडचणीत कसा येईल? याचा विचार मोदींकडून केला जातो” असंही शरद पवार म्हणाले.

हे पण वाचा- “ही निवडणूक सोपी नव्हती, पण बारामतीकर कधी…”, शरद पवारांचा मोदींना टोला; म्हणाले, “त्यांना त्याचा चमत्कार…”

मराठा ओबीसी प्रश्नात केंद्राने हस्तक्षेप करावा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं आंदोलन सुरु आहे, तर ओबीसींसाठी लक्ष्मण हाके लढा देत आहेत. याबाबत विचारलं असता “या प्रश्नात आता केंद्र सरकारने हस्तक्षेप करायची गरज आहे. दोन्ही मुद्दे निकालात काढले गेले पाहिजेत. सामाजिक ऐक्याला बाधा पोहचणार नाही याची काळजी घेऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे. केंद्र सरकारला या प्रश्नांमध्ये फक्त बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही” असंही शरद पवारांनी सुनावलं आहे.

मोदींपेक्षा जास्त मतं आमच्या सुप्रियाला मिळाली

“बारामतीकरांनी मला १९६७ मध्ये कठीण काळात मला निवडून दिलं. सोमेश्वर कारखान्याचे बाबूलाल काकडे हे माझ्या विरोधात उभे होते. मी कॉलेज जीवन संपवून बाहेर पडलो होतो. बारामतीतल्या तरुणाईने मला कायमच साथ दिली आहे. सुप्रिया सुळे यांची ही चौथी निवडणूक होती. तरीही त्यांना प्रचंड मतांनी बारामतीकरांनी निवडून दिलं. बारामतीतल्या जनतेला कुठलं बटण दाबायचं ते सांगावं लागत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दीड लाख मतांनी निवडून आले. तर आमच्या सुप्रियाला दीड लाखांहून अधिक मतं मिळाली. देशाच्या पंतप्रधानांपेक्षा आमची सुप्रिया जास्त मतांनी निवडून आली.” असं शरद पवारांनी म्हटलं आहे. आता त्यांच्या वक्तव्यावर भाजपाकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.